Loksabha 2019 : नेत्यांच्या भाषणात ठराविक शब्दांचाच वापर

Loksabha 2019 :  नेत्यांच्या भाषणात ठराविक शब्दांचाच वापर

या ठिकाणी सांगू इच्छितो..., वावगं ठरणार नाही..., चुकीचं ठरणार नाही, आणि म्हणून..., खरंतर..., यासंबंधी..., खऱ्याअर्थाने...हे शब्द नेत्यांच्या तोंडून ऐकायला  मिळाले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांच्या कानावर हे शब्द घोंघावणार आहेत. 

दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या भाषणात ‘या ठिकाणी...’ हा शब्द सर्रास येतो. पाच मिनिटांचे भाषण असेना का त्यात ‘या ठिकाणी...’ हा शब्द उच्चारला गेला नाही, असे होणार नाही. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या भाषणात ‘आणि म्हणून...’ या शब्दाची पुनरावृत्ती होणे हे नवीन राहिलेले नाही. तसेच त्यांच्या भाषणात ‘या ठिकाणी...’ हा शब्दही हमखास येतो. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या भाषणात ‘वावगे ठरणार नाही...’, ‘चुकीचे होणार नाही...’ हा शब्द परवलीचा झाला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाषणच वेगळे ठरते. थेट महाभारत, रामायणातील काही उदाहरणे सांगत भाषण करणे, ही त्यांची खासियत आहे.

माजी आमदार विनय कोरे यांच्या भाषणालाही ‘या ठिकाणी...’ या शब्दाची जोड आहे. ‘खरंतर...’ हा शब्दही ते भाषणात आवर्जून वापरतात. 

आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या भाषणाची गाडीसुद्धा ‘या ठिकाणी...’ या प्लॅटफॉर्मवर थांबल्याशिवाय पुढे जात नाही.
विशेष म्हणजे, राज्यातील बहुतांशी नेत्यांच्या भाषणात ‘या ठिकाणी...’ या शब्दाला पर्याय नाही, असेच दिसते. अगदी ग्रामीण ढंगात बोलणारे नेतेही ‘या ठिकाणी...’ या शब्दाला सोडू इच्छित नाहीत. शब्दाची पुनरावृत्ती चांगली की वाईट, हा विषय चर्चेचा ठरेल. मात्र, नेत्यांकडून हे शब्द उच्चारले गेले नाहीत, तर मतदारांना चुकल्या चुकल्यासारखे वाटल्याशिवाय राहणार नाही. शब्द तेच तेच वापरले जात असले तरी भाषणातून ते एकमेकांच्या उकाळ्या-पाकाळ्या काढतील आणि मतदारांची चांगलीच करमणूकही होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com