निवडणुकांची रणधुमाळी

विनायक लांडे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

2020 या वर्षातही निवडणुकांच्या वातावरणामध्ये राजकारणाच्याच चर्चांना उधाण येणार आहे.

नगर : मागील सहा महिन्यांत लोकसभा, विधानसभा निवडणुकांची हलगी वाजली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या सत्तासमीकरणाचा गोंधळही रंगला. दुसरीकडे, जिल्ह्यात आगामी वर्षात जिल्हा सहकारी बॅंक, 765 ग्रामपंचायती, आठ सहकारी साखर कारखाने, दहा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांना ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान असते. 2020 या वर्षातही निवडणुकांच्या वातावरणामध्ये राजकारणाच्याच चर्चांना उधाण येणार आहे.

 
ग्रामीण भागातील शेतशिवारासाठी, आर्थिक प्रगतीसाठी मागील सहा दशकांच्या कारकिर्दीत जिल्हा सहकारी बॅंकेने दिलेले योगदान पथदर्शी आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बॅंक ग्रामीण भागातील प्रत्येक घराशी जोडलेली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाची मागील पंचवार्षिक निवडणूक मे 2015मध्ये झाली होती. आता एप्रिल 2020मध्येच बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पुढील वर्षात नगर जिल्ह्यातील आठ कारखान्यांची संचालक मंडळे निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. नगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा जिल्हा मानला जातो.

सहकारातील निवडणुका रंगतदार असल्याने चर्चेत असतात. 
जिल्ह्यात 14 बाजार समित्यांपैकी 10 बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची उलाढाल मुख्यत्वे कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे केली जाते. विश्‍वसनीय पद्धतीने शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जाऊन त्यांच्या घामाचे दाम योग्य रीतीने मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न समित्या अस्तित्वात आल्या.

या समित्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य, हमाल-मापाडी व सेवा संस्थांतील चार मतदारसंघांसाठी मतदान होते. त्यातील मतदारांची संख्या मोजकी असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली, अर्थात जिल्हा निवडणूक शाखेमार्फत या निवडणुका पार पडतील. मतदारयादीत आता नव्याने शेतकऱ्यांचाही समावेश असणार आहे. 

जिल्ह्यात 1602 गावे आहेत. नव्याने चार ग्रामपंचायती अस्तित्वात आल्याने, ग्रामपंचायतींची संख्या 1316पर्यंत वाढली आहे. पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या 765 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. "नवे गडी नवे राज्य' स्थापन करण्यासाठी गावकारभारी लवकरच कामाला लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने या निवडणुका पार पडणार आहेत. 

या कारखान्यांच्या होणार निवडणुका 
साखर कारखाने - मुदत संपण्याचा कालावधी 
अशोक (ता. श्रीरामपूर) - 20 एप्रिल 2020 
मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर (ता. नेवासे) - 27 मार्च 2020 
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (ता. राहाता) - 6 मार्च 2020 
शिवाजीराव नागवडे (ता. श्रीगोंदे) - 20 एप्रिल 2020 
कुंडलिकराव जगताप पाटील (ता. श्रीगोंदे) - 21 एप्रिल 2020 
मुळा (ता. नेवासे) - 23 मार्च 2020 
श्री वृद्धेश्वर (ता. पाथर्डी) - 27 मार्च 2020 
भाऊसाहेब थोरात (ता. संगमनेर) - 16 मार्च 2020 

बाजार समित्यांचा मुदत संपण्याचा कालावधी 
जामखेड-18 एप्रिल 2020 
कर्जत-25 जुलै 2020 
संगमनेर-25 जुलै 2020 
राहाता-25 जुलै 2020 
राहुरी-22 ऑगस्ट 2020 
श्रीरामपूर-8 ऑगस्ट 2020 
नेवासे-8 ऑगस्ट 2020 
शेवगाव-8 ऑगस्ट 2020 
पाथर्डी-3 ऑक्‍टोबर 2020 
कोपरगाव-10 ऑक्‍टोबर 2020 
... 
तालुकानिहाय ग्रामपंचायती 
अकोले-51 
संगमनेर-93 
कोपरगाव-29 
श्रीरामपूर-27 
राहाता-25 
राहुरी-45 
नेवासे-59 
नगर-57 
पारनेर-88 
पाथर्डी-78 
शेवगाव-48 
कर्जत-56 
जामखेड-50 
श्रीगोंदे-59 

एप्रिलमध्ये रणधुमाळी सुरू 
जिल्हा सहकारी बॅंक संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या कालावधी 5 मे 2020 
... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections