esakal | सांगली जिल्ह्यातील वीज थकबाकी 1535 कोटींवर; लाखो ग्राहकांना वीज बिलमाफीची प्रतीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity arrears in Sangli district reached at 1535 carore;  Millions of customers wait for electricity bill waiver

जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची थकबाकी 1535 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेने ज्याप्रमाणे बॅंकांची थकबाकी वाढली, तीच परिस्थिती वीज बिलाबाबत निर्माण झाली आहे. 

सांगली जिल्ह्यातील वीज थकबाकी 1535 कोटींवर; लाखो ग्राहकांना वीज बिलमाफीची प्रतीक्षा 

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ केली जातील या आशेवर लाखो ग्राहक प्रतीक्षेत आहेत. परंतु बिल माफीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. या सर्व परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांची थकबाकी 1535 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेने ज्याप्रमाणे बॅंकांची थकबाकी वाढली, तीच परिस्थिती वीज बिलाबाबत निर्माण झाली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर राज्यात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वीज बिल वाचन, बिले वाटप आणि वसुली केंद्रे बंद करण्यात आली. ग्राहकांना ऑनलाईन वीज बिले भरण्याचे आवाहन करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर बिले वाटप करताना तीन महिन्यांचे बिल एकदम देण्यात आले. तसेच हे बिल वाढीव होते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी ते भरण्यास नकार दिला. वीज बिलाबाबतच्या शंका दूर करण्यासाठी महावितरणने प्रत्येक कार्यालयात व्यवस्था केली. अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या. त्याचा थोडा फार परिणाम वसुलीवर झाला. 

एकीकडे थकीत वीज बिलासाठी महावितरणने ग्राहकांना आवाहन करण्यास प्रारंभ केला असताना, दुसरीकडे स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर वीज बिले माफ करावीत यासाठी काहींनी मोहीम उघडली. तसेच ग्राहकांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यामुळे महावितरणचे वीज बिल भरणा करण्यासाठी हप्त्यांची सवलत दिली परंतु थकबाकी काही कमी झाली नाही. ग्राहकांना मात्र वीज बिल माफ होण्याची प्रतीक्षा लागली. 

दिवाळीपूर्वी थकीत वीज बिलाबाबत दिलासादायक विधान ऊर्जामंत्री यांनी केले. परंतु त्यानंतर कोणताच निर्णय झाला नाही. उलट थकबाकी वसुलीसाठी परिपत्रक काढण्यात आले. वसुलीसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्या, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. 

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे यासाठी राजकीय पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनास सुरवात केली आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांना प्रतीक्षा लागली आहे. दुसरीकडे लाखो ग्राहकांनी नियमित वीज बिल भरण्यास सुरवात केली आहे. या सर्व परिस्थितीत जिल्ह्यातील 5 लाख 89 हजार ग्राहकांकडे 1535 कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे. यापैकी कृषी बिल थकबाकीचा विषय वगळला, तर उर्वरित थकबाकी 355 कोटी रुपये इतकी आहे. 

संपादन : युवराज यादव 
 

loading image