इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा शेतकऱ्यांना लाभदायी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्याचा वापर शंभर टक्के सुरू झाल्याने गेल्या दोन वर्षात गूळ उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास वीस कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. यंदाच्या हंगामातही गूळ बाजारात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन मापाचा वापर होणार आहे. तसेच सौदा स्थळावर वजन मापापासून बिलांची पट्टी वेळेत मिळण्यापर्यंत देखरेख करण्यासाठी बाजार समितीचे पथक कार्यरत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गुळाला अचूक भाव मिळण्यास मदत होणार आहे. गुळाचे वजन इलेक्‍टॉनिक काट्यावर शंभर टक्के करणारी कोल्हापूर बाजार समिती एकमेव आहे.

बाजार समितीत पूर्वी वजनतांगडी किंवा तत्सम वजन मापाद्वारे शेतीमालाचे वजन करून भाव दिला जात होता. यात अनेकदा वजनात फरक येत होता. घट-तूट धरून शेतकऱ्यांच्या मालातील काही वाटा वजनात कमी झाल्याने नुकसान सोसावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्याचा वापर करण्याविषयी सूचित केले होते. कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी सर्वात प्रथम त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे परगावाहून कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना अचूक वजनामुळे अचूक भाव मिळू लागला. त्यांचे नुकसान टळण्यास मदत झाली. परिणामी शेतकरी येथील बाजारात विश्‍वासाने येऊ लागला असून येथील कांदा-बटाटा उलाढाल 200 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

गूळ बाजारातही अनेक वर्षे पारंपरिक वजन काट्यावर गुळाचे वजन होत होते. वजन काट्यात तांत्रिक बिघाड झाला तर 20 ते 50 ग्रॅम वजन कमी आले तरी एका गुळाच्या रव्याला दोन ते पाच रुपयांचा तोटा सोसावा लागत होता. अशा पाचशे गूळ रव्यांचे वजन कमी झाल्यास दीड-दोनशे रुपयांचे नुकसान व्हायचे. बाजारात येणाऱ्या एकूण गुळापैकी वर्षाला दहा पंधरा कोटी रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सोसावा लागायचा. तो भरून निघाला आहे.

गेल्या दोन वर्षात इलेक्‍ट्रॉनिक वजन वापरासंदर्भात बाजार समितीने सक्ती केली. गूळ बाजारातही इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्याची सक्ती केल्यानंतर येथील व्यापारी, अडत्यांनी इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्याचा वापर सुरू केल्यामुळे येथे येणाऱ्या गुळाचे काटेकोरपणे वजन होते. भावही वजनानुसार दिला जातो. यंदा गूळ हंगामात सौदे निरीक्षणासाठी बाजार समितीचे पर्यवेक्षक व दोन कर्मचारी नियुक्त करण्यात येतात. त्यांच्याकडून सौदे व्यवहारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशाच प्रकारे भाजीपाला बाजारातही इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनाचा वापर सुरू झाल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान टळण्यास मदत झाली आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काट्यामुळे गुळाचे वजन अचूक होते. शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता उरत नाही. त्या वजनानुसार शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतो. हा व्यवहार सौद्यासाठी अधिक पारदर्शक असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काटा सौदे व्यवहारात महत्त्वाचा दुवा ठरला आहे.
- मोहन सालपे,उपसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Electronic weight cut beneficial to farmers