गगनबावडा तालुक्‍यातील सांगशी येथे टस्कराचा मुक्काम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

असळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

असळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे.

चंदगड, आजरा, राधानगरी, बोरबेटमार्गे टस्कर हत्ती १९ मे रोजी गगनबावडा तालुक्‍यात आला होता. तीन दिवसांचा मुक्काम करून तो पन्हाळा व नंतर शाहूवाडी तालुक्‍यात गेला. याठिकाणी त्याने तब्बल चार महिने तळ ठोकत मोठे नुकसान केले. 

हा टस्कर हत्ती कोलीक-पडसाळीमार्गे शुक्रवारी पहाटे चार वाजता गगनबावडा तालुक्‍यात दाखल झाला. कोदे बुद्रुक, खोकुर्ले, असळज, पळसंबे, बुवाचीवाडी, जरगी, तळये, कातळी, नरवेली असा प्रवास करत तो काल रात्री सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे.

गगनबावडा वन विभागाने येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यानचा मुख्य रस्ता व कुंभी नदीचे पात्र पार करून जरगी धनगरवाड्याजवळील जंगलात गेल्याने बोरबेट-मानबेटमार्गे राधानगरीकडे परतीचा प्रवासास लागेल, अशी शक्‍यता वर्तवली होती. प्रत्यक्षात उजवीकडे वळून गगनबावडामार्गे तो सांगशीत गेला आहे. आनंदा रामचंद्र पाटील, भागोजी पाटील (तळये), 

सिलेमान रेठरेकर, बाळू कांबळे, नदीम मोमीन (कातळी), रुपाली रमेश काटकर, मारुती बाबूराव पाटणकर, निंबाळकर (सांगशी) इत्यादी शेतकऱ्यांचे ऊस व भात पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.

तळ टाकण्यास पोषक
गतवर्षीच्या टस्करने एक महिना सांगशी येथे तळ ठोकला होता. जंगल, पाणी व चांगली  पिके अशी पोषक स्थिती असल्याने हा टस्कर येथेच जादा दिवस तळ ठोकणार, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

गगनबावडा वनविभागाच्या वतीने दोन पथके तैनात केली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत.
- एस. व्ही. सोनवले 

परिक्षेत्र वन अधिकारी, गगनबावडा.

Web Title: Elephant found in Sangashi in Gaganbawada Taluka