लिंगनूर-कापशीत दारूबंदीसाठी "एल्गार' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

म्हाकवे - लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील महिलांनी दारूची उभी बाटली आडवी करण्यासाठी एकीची वज्रमूठ बांधली आहे. महिलांनी संघटित होऊन दारूबंदीचा "एल्गार' पुकारला असून, महिला प्रचाराचे रान उठवत रणरागिणींनी दारूबंदीचा निर्धार केला आहे. या दारूबंदीला गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते, तसेच डाव्या चळवळीचीही साथ मिळत आहे. 

म्हाकवे - लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील महिलांनी दारूची उभी बाटली आडवी करण्यासाठी एकीची वज्रमूठ बांधली आहे. महिलांनी संघटित होऊन दारूबंदीचा "एल्गार' पुकारला असून, महिला प्रचाराचे रान उठवत रणरागिणींनी दारूबंदीचा निर्धार केला आहे. या दारूबंदीला गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते, तसेच डाव्या चळवळीचीही साथ मिळत आहे. 

गावातील दारूबंदीसाठी येथील महिलांचा प्राथमिक शाळेमध्ये व्यापक मेळावा झाला. या वेळी दारूच्या व्यसनामुळे आलेल्या संकटांचा पाढा वाचताना अनेक महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. जे असह्य जीवन आमच्या वाटेला आले, आमच्या मुलांच्या शिक्षणाची परवड झाली, ती वेळ यापुढे इतरांवर येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत कोणाच्या भूलथापांना बळी न पडता निर्भीडपणे दारूबंदी होईपर्यंत एकसंध राहण्याची शपथही महिलांनी घेतली. 

गावची लोकवस्ती कमी असतानाही येथे दारूची पाच दुकाने सुरू होती; परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार निपाणी-राधानगरी या राज्य मार्गालगत पाचशे मीटर अंतरावर असणारी गावातील पाचही दुकाने उत्पादन शुल्क विभागाने बंद केली. अडचणीत आलेल्या या दुकानमालकांनी ग्रामपंचायतीकडून स्थलांतराचे परवाने घेऊन थेट गावात दुकाने सुरू करण्याच्या हालचाली केल्या. मध्यवर्ती, तसेच शाळा, अंगणवाडीजवळ दारू दुकाने सुरू होणार असल्यामुळे दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या. त्यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करत गावातील सर्वच महिलांमध्ये दारूबंदीसाठी जनजागृती करून सह्यांची मोहीम राबविली आहे. 

या वेळी वंदना आवळेकर, लक्ष्मी खतकर, कांता ढेंगे, रेवती मडके, शारदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संभाजी यादव, तुलशीदास किल्लेदार यांनीही गावातील दारूबंदी व्हावी, यासाठी प्रबोधन केले. जवळपास दोनशेहून अधिक महिलांसह या दारूबंदीच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

करणार जनजागृती... 
राज्य मार्गावरील या गावात दारूची पाच दुकाने सुरू होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार मार्गालगत असणारी ही पाचही दुकाने उत्पादन शुल्क विभागाने बंद केली. अडचणीत आलेल्या या दुकानमालकांनी ग्रामपंचायतीकडून स्थलांतराचे परवाने घेऊन थेट गावात दुकाने सुरू करण्याच्या हालचाली केल्या. या विरोधात महिला एकवटल्या असून, त्या आता गावात जनजागृती करणार आहेत.

Web Title: Elgar for wine ban