महापालिकेत कर्मचाऱ्यांची मक्तेदारी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 24 मे 2017

सोलापूर - एकाच टेबलवर तीन नव्हे, चार नव्हे तर तब्बल ११-११ वर्षे नियुक्ती राहिल्याने महापालिकेच्या काही विभागांत कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना नागरिक भेटले असता त्यांच्या संवादातून मुजोरपणा व मस्तवालपणा दिसून येतो. त्यामुळे आयुक्त डॉ. ए. के.  ढाकणे याबाबत गांभीर्याने निर्णय घेतात, की आहे तीच परंपरा कायम ठेवतात, याबाबत उत्सुकता असणार आहे.

सरकारच्या नियमानुसार एका टेबलवर तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नेमणूक करता येत नाही. मात्र, महापालिकेतील अनेक कर्मचारी चार ते ११ वर्षांपासून एकाच टेबलवर काम करीत आहेत. ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्या, तरी त्यांचा पगार मात्र मूळच्याच खात्यात निघत असल्याने ते नव्या खात्यात आहेत की पूर्वीच्या, याबाबत संभ्रम आहे. अशा कर्मचाऱ्यांचे आपापल्या विभागात वर्चस्व निर्माण झाले असून, नागरिकांशी काहीजणांचे बोलणेही ‘कर्मचाऱ्या’प्रमाणे नसते, हे वारंवार दिसून आले आहे. 

अपवाद वगळता काही कर्मचाऱ्यांची बदली करण्याची गरज असतानाही ती करता येत नाही. इतकी वर्षे एकाच टेबलवर काम करण्यासाठी या कर्मचाऱ्यांमागे कोणाचा वरदहस्त आहे, हे अद्याप पुढे आलेले नाही. या कर्मचाऱ्यांची जणू मक्तेदारीच निर्माण झाल्याने बदलून येणाऱ्या खातेप्रमुखांनाही ते ‘अधिकारी’ म्हणून गिनत नाहीत. खातेप्रमुख वर्ष-दोन वर्षांत बदलतील; आम्ही मात्र कायमचे, असा त्यांचा आविर्भाव असतो. अनेक वर्षांपासून बदल्याच न झाल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे.

दिव्याखाली अंधार...
कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करण्याची जबाबदारी ज्या खात्यावर आहे, त्या सामान्य प्रशासन विभागातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे येथील काही कर्मचारी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना दाद देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Web Title: Employees Monopoly in Municipal Corporation