फोन करा अन्‌ मिळवा रोजगार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सातारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करण्याची इच्छा असल्यास आता काम मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वीप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज भरावा, असे बंधन राहिले नसून, फोन, मेलद्वारेही कामाची मागणी करता येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गरजूंना काम मिळविणे आणखी सोपे झाले आहे. 

सातारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करण्याची इच्छा असल्यास आता काम मिळविण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पूर्वीप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज भरावा, असे बंधन राहिले नसून, फोन, मेलद्वारेही कामाची मागणी करता येणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गरजूंना काम मिळविणे आणखी सोपे झाले आहे. 

यापूर्वी रोजगाराच्या मागणीसाठी संबंधितांना विहित नुमन्यातील अर्ज ग्रामपंचायतींना द्यावा लागत होता. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेकडे दिला जातो. नंतर त्याला मंजुरी मिळते. आता मात्र अशी मागणी दूरध्वनी, मेलद्वारेही करता येणार असल्याचे या विभागातील दिलीप काकडे यांनी सांगितले. ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टलमध्ये अस्मिता योजनेतील विद्यार्थिनींची नोंदणी करण्याबरोबर आता रोजगार हमी योजनेतील कामावरील हजेरीपट नोंदणी करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. राज्यात सध्या ‘मनरेगा’ची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. योजनेवर काम करणाऱ्यांचा हजेरीपट सध्याच्या प्रचलित पद्धतीद्वारे न काढता ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवर ई- मस्टर करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सध्या ग्रामपंचायत स्तरावर ‘मनरेगा’च्या कामासाठी स्वतंत्र संगणक सुविधा नाही. त्यामुळे मजुरांना वेळेत मजुरी मिळत नव्हती. काम बंद झाल्यापासून १५ दिवसांत मजुरांना अकुशल वेतन देणे बंधनकारक आहे. 

ग्रामरोजगार सेवकांची ई-मस्टर नोंदणी
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणकीय कामकाजासाठी ‘आपले सरकार’ केंद्र कार्यरत आहे. आता या केंद्रात ग्रामरोजगार सेवकांच्या मदतीने ई-मस्टरची नोंदणी केली जाईल. त्यामुळे पंचायत समितीमध्ये मस्टर पोचण्यास लागणारा विलंब टाळला जाईल. ‘आपले सरकार’ केंद्र चालकाला सेवाशुल्क म्हणून ई-मस्टरसाठी पाच रुपये दिले जाणार आहेत. 

टोल फ्री क्रमांकावर माहिती
www.mahaegs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर योजनेविषयी माहिती देण्यात आली असून, त्यावर १८००२२३८३९ हा मदत कक्षातील टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर संपर्क साधल्यानंतर कामाची नोंदणी करता येते. शिवाय, तक्रार असल्यास तक्रारही करता येणार आहे. कामाची नोंदणी करताना जॉबकार्ड असणे अत्यावश्‍यक आहे. 

Web Title: employment guarantee scheme