अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सातारा - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र केली आहे. आज पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्यात आले.

सातारा - विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम तीव्र केली आहे. आज पोवई नाका ते मुख्य बस स्थानक रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्यात आले.

शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हा गंभीर विषय बनला होता. विक्रेत्यांनीच पदपथ व्यापल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागत होते.  विशेषत: राजवाडा व पोवई नाका ते मुख्य बस स्थानक परिसरात हा प्रश्‍न गंभीर बनला होता. पोवई नाका ते बस स्थानक रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. नव्याने पदपथ तयार केलेत. रस्त्यावर दुभाजक बसविले आहेत. मात्र, संपूर्ण पदपथ हा विक्रेत्यांनीच व्यापला होता.

त्यामुळे प्रामुख्याने महाविद्यालयीन युवक-युवतींचा लोंढा रस्त्यावरून चालत असायचा. निम्मा रस्ता पादचाऱ्यांनीच व्यापला जायचा. त्यातून अपघाताच्या घटना वाढत होत्या. याबाबत ‘सकाळ’नेही अनेकदा वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, बांधकाम विभाग व नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती.

गेले दहा दिवस श्री. नांगरे-पाटील तपासणीच्या निमित्ताने जिल्ह्यात होते. या वेळी शहरात फिरताना त्यांचे या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधले गेले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची होत असलेली कुंचबणा लक्षात घेऊन अतिक्रमणमुक्त पदपथ मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना दिल्या. १५ दिवसांत पदपथ मोकळे होतील, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांशी झालेल्या बैठकीत दिले होते. 

श्री. नांगरे-पाटील यांच्या आश्‍वासनुसार शहर पोलिसांनी कालपासून पदपथ मोकळे करण्याची मोहीम सुरू केली. काल येथील विक्रेत्यांना न बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पदपथावरील दुकाने मोकळी होती. मात्र, त्यांच्या शेडमुळे पदपथ मोकळा झालेला नव्हता. पोलिस महानिरीक्षक येथे असल्यामुळे पोलिसांनी एक दिवस दिखावा केला असेल असे विक्रेत्यांना वाटले. त्यामुळे आज सकाळपासून पुन्हा पदपथ व रस्त्यावर दुकाने थाटली गेली. मात्र, पोलिसांनी आज पुन्हा मोहीम सुरू केली. थाटलेली दुकाने गुंडाळायला लावली. न ऐकणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्याची प्रक्रियाही राबविण्याची पोलिसांची तयारी होती. त्यामुळे दुपारपर्यंत पदपथ व रस्त्यावरील दुकाने हटली होती. 

पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी
दरम्यान, दुकाने बंद करण्याबरोबरच पदपथावर असलेली अतिक्रमणे काढण्यासंदर्भातही पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी आज नागरिकांकडून होत होती.

Web Title: encroachmentfree sidewalk intense campaign