इंग्रजी शाळांचा गाडा रुतलेलाच; ऑनलाईन शिक्षणालाच पसंती 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

इंग्रजी शाळांवर सरकारचे थेट नियंत्रण नाही. पालकांकडून मिळणाऱ्या फी वरच या शाळांची भिस्त. त्यामुळे शासनाच्या सूचनांपेक्षा पालक काय म्हणतात हे या शाळांसाठी अधिक महत्वाचं.

 

सांगली ः नववी ते बारावीचे वर्ग भरवण्यासाठी शासन आदेश आल्यानंतर सरकारी शाळांची मोठी लगबग सुरु असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा मात्र सावधपणे पाऊले टाकताना दिसत आहे. इंग्रजी माध्यमातील मुलांचे पालक अधिकच चिंतेत असून संस्थाचालकांनी पुढे काय होतंय याचा कानोसा घेत शाळा सुरु ठेवल्या आहेत. 

इंग्रजी शाळांवर सरकारचे थेट नियंत्रण नाही. पालकांकडून मिळणाऱ्या फी वरच या शाळांची भिस्त. त्यामुळे शासनाच्या सूचनांपेक्षा पालक काय म्हणतात हे या शाळांसाठी अधिक महत्वाचं. त्यामुळे या शाळांनी पालक शिक्षक समितीच्या सदस्यांच्या सूचना मागवल्या आहेत. बहुतेक ठिकाणी नववी-दहावी या दोन वर्ग सुरु करण्याचाच प्रश्‍न. शाळा सुरु करताना अनेक शाळांसमोर वाहतूक व्यवस्था, काही शाळांना मेसचीही व्यवस्था यांचा विचार करावा लागणार. त्यासाठीचे आर्थिक गणित बसवयाचे तर वर्गात किती मुले येणार हे महत्वाचे.

पालक मंडळी अतिसंवेदनशील. कोरोनच्या दुसऱ्या लाटेच्या शक्‍यतेमुळे अनेक पालकही संभमावस्थेत आहेत. त्यामुळे इंग्रजी शाळांचा गाडा मंदगतीने पुढे सरकताना दिसत आहे. त्याचवेळी इंग्रजी शाळांनी गेले आठ महिने ऑनलाईन अध्यापन नेटाने सुरु ठेवले आहे. सध्याच्या या धामधुमीतही त्यांनी त्यात खंड पडू दिलेला नाही. 

 

फी बाबतही संभ्रमावस्था 
इंग्रजी शाळांपुढे फी वसुलीचा गंभीर प्रश्‍न आहे. अनेक शाळांनी स्वतःहून पन्नास टक्के फी तरी भरावी अशी सवलत दिली. मात्र पालकांनी ती भरण्याबाबतही असमर्थता दर्शवली आहे. जवळपास पन्नास टक्के पालकांकडून फी मिळाली नसल्याची संस्थाचालकांची तक्रार आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा गाडा अक्षरक्षः रुतला आहे. 

 

""आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती बरी आहे. मात्र नववी दहावी वर्गात मात्र नगण्य उपस्थिती आहे. पालक भितीच्या छायेत आहेत. ऑनलाईन वर्ग मात्र नियमित सुरु आहेत.'' 
कपील राजपूत 
राजपूत इंग्लिश मेडियम स्कुल 

 

"" विद्यार्थ्यांची उपस्थिती बरी आहे. वर्ग भरत आहे. सुरक्षा साधने वापरून वर्गात उपस्थित वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.'' 
सागर बिरनाळे 
आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कुल 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: English school Prefer online learning