यशस्वी आयुष्याचा मंत्र: वयाच्या ९५ व्या वर्षीही शाकाहार, व्यायाम अन्‌ उद्यमशीलता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021


जीवन त्यांना कळले हो..!

सांगली : शाकाहार, व्यायाम आणि उद्यमशिलता माझ्या जगण्याचा मंत्र आहे. वयाच्या ९५ व्या वर्षीही सतत कार्यमग्न उद्योजक रामसाहेब वेलणकर यशस्वी आयुष्याचा मंत्रच सांगत होते.  सांगलीच्या उद्योग क्षेत्राचा पाया घालणाऱ्या श्री गजानन मिल या शतकमहोत्सवी कापड निर्मिती उद्योगाचे अध्वर्यु असलेले रामसाहेब आजही सांगलीतील विविध उपक्रमात अधूनमधून उत्साहाने दिसतात. त्यांच्या या दीर्घायुष्यी जगण्याचा मंत्र मोजक्‍या शब्दात सांगितला.

दादासाहेब वेलणकरांच्या मुशीत घडलेल्या रामसाहेबांची महाबली हनुमानावर नितांत श्रद्धा. संपूर्ण शाकाहार, सात्त्विक जीवनशैली, न चुकणारा व्यायाम, प्रचंड इच्छाशक्‍तीला उद्यमशीलतेची जोड यामुळे त्यांची शतकमहोत्सवाकडे निरोगी वाटचाल सुरू आहे. साधेपणाचा संस्कार घेऊन जन्मजात मिळालेल्या गर्भश्रीमंतीचा बाऊ न करता गरजू माणसाला नाराज न करता मदतीचा हात देणारे रामसाहेब समस्त सांगलीकरांसाठी आदरणीय. ते म्हणाले,‘‘गरजू, अडचणीत असलेल्यांना शब्दाचा नुसता कोरडा दिलासा न देता प्रत्यक्ष कृतीप्रवण राहिले पाहिजे. हाच आपल्यासाठी देवाचा आशीर्वाद असतो.

हेही वाचा- नवीन वर्षात उत्कृष्ट भाषण करणाऱ्या युवा वर्गाला हेलीकॉप्टरमधून बेळगाव दर्शनाची संधी -

दिवसाची सुरवात व्यायामाने यात कधी खंड पडला नाही. तरुणपणी पोहणे, धावणे यासह जोर-बैठकां अशी व्यायामाची शिस्त असायची. आजही हे व्यायामप्रेम कायम आहे. आमराई क्‍लबमधील जीममध्ये सकाळी हजर असतो. कोरोना काळातही त्यात कधी खंड पडला नाही.’’ते म्हणाले,‘‘हलका आहार हवा. तेलकट, तिखट, चमचमीतपेक्षा शरीराला पचेल, रुचेल असाच आहार हवा. दूध, केळी, बेदाणे, खजूर, पोळी, भात याला प्राधान्य हवे. 

संकटांचा डोंगर जरी कोसळला तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडणार हा आत्मविश्‍वास हवा. उपभोगापेक्षा उपयुक्‍तता महत्त्वाची हेच माझे तत्त्वज्ञान, जगण्याचे सार आहे. उघड्या डोळ्यांनी जगाकडे पहा. युरोप, जपान, सिलोन, अमेरिका, कॅनडा भ्रमंतीने जगणे प्रगल्भ होत गेले. वाचन हे टॉनिक आहे. पुण्यात पदवीचे शिक्षण घेताना लागलेली वाचनाच्या गोडी आजही कायम आहे. नित्यवाचनाने बुद्धी तल्लख व कार्यक्षम राहते.’’

  जीवनमंत्र
    हलका आहार
    नित्य व्यायाम
    उद्यमशिलता
    नियमित वाचन
    जगभर भ्रमंती
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur Raosaheb Velankar health stories sangli