चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सटाणा : बेळगावमध्ये मराठी भाषिकांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात असतानाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगावात कर्नाटक गौरव गीत गाऊन महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. महसूलमंत्र्यांनी मराठी भाषिक जनतेची माफी मागून तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे निवेदनाद्वारे आज देण्यात आला.

बागलाणचे नायब तहसीलदार दीपक धिवरे यांची आज भेट घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. निवेदनात, बेळगाव हा संयुक्त महाराष्ट्राचा भाग व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. बेळगाव भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय व अत्याचार सुरू आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत कर्नाटक सरकारला जाब विचारण्याऐवजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगावात जाऊन कर्नाटकाचे गौरव गीत गाणं अयोग्य आहे. यामुळे बेळगावातील मराठी भाषिकांचा अपमान झाला आहे. गेली ६२ वर्षे लढा देणाऱ्या सीमा भागातील जनतेच्या भावनांचा त्यांनी विचार करायला हवा होता. बेळगावातील मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाची कोणतीही दखल न घेता कर्नाटक शासनाचे गौरव गीत गाणे म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांनी मराठी बांधवांची माफी मागून तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बच्छाव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सावकार, सनीर देवरे, रोहित अहिरे, माणिक पवार, मनीष शेलार, मुन्ना राजपूत, सागर गवळी, किरण वाघ, देवेंद्र अहिरे, केवळ देवरे, सचिन जाधव, प्रसाद दळवी, नितीन काकडे, अक्षय सोनवणे, पोपट चौरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: esakal marathi news chandrakant patil resignation controversy