सावकारांना भीती दाखविण्यासाठी पोलिसांचा वापर ! 

परशुराम कोकणे
मंगळवार, 13 मार्च 2018

सावकाराला कर्जाचे पैसे परत दिल्याच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. अनेक प्रकरणांमध्ये तोंडी व्यवहार होतो. कायदेशीर प्रक्रिया न करता सावकाराकडून पैशासाठी होणारा त्रास कमी व्हावा असे लोकांचे म्हणणे असते. नागरिकांनी परवानाधारक सावकारांकडेच व्यवहार करावा. व्यवहार करताना कोरे धनादेश देऊ नये. त्यावर सह्या करू नये. पैशासाठी कोणीही त्रास देत असेल तर पोलिसात फिर्याद द्यावी. 
- नितीन थेटे, सहायक पोलिस निरीक्षक, सावकारी विरोधी पथक

सोलापूर : कागदोपत्री नोंदी न करता पैशांची देवाण-घेवाण करायची.. सावकाराकडून घेतलेले काही पैसे परत दिले की टाळाटाळ चालू करायची.. त्यानंतर सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडून त्रास दिला जातोय म्हणून पोलिस आयुक्तालयातील सावकारी विरोधी पथकाकडे तक्रार द्यायची.. पोलिसांना घाबरून सावकाराने नमती भूमिका घेतली की झाले. फिर्याद न देता निघून जायचे... असे प्रकार सोलापुरात वाढले असून छोट्या सावकारांना भीती दाखविण्यासाठी पोलिसांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. 

सोलापुरात कुमठा नाका, विजापूर नाका झोपडपट्टी, भवानी पेठ, बाळे, कल्याण नगर, नई जिंदगी या भागात व्याजाने पैसे देण्या-घेण्याचा व्यवसाय जोरात चालतोय. मध्यमवर्गीय कामगार आणि चतुर्थश्रेणीतील कामगारांमध्ये हा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिकृत आणि अनधिकृत सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रारी आल्यानंतर चौकशी करून कारवाई करण्याचे काम पोलिस आयुक्तालयात सावकारी विरोधी पथकाकडून चालते. गेल्या वर्षभरात या पथकाकडे 131 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील 125 अर्जांची निर्गती करण्यात आली आहे. गुन्ह्याचे स्वरुप आणि पुरावे पाहून 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पथकाकडे मोठ्या सावकारांविरोधात आजवर एकही तक्रार आली नाही. आजवर आलेल्या तक्रारींमध्ये छोटे सावकार अधिक आहेत. यातील अनेक तक्रारी सावकारांचा पैसा बुडविण्याच्या हेतूने केल्याचे समोर आले आहे. 

आपापसात मिटवली जाते तक्रार 
घरगुती अडचण सांगून छोट्या सावकारांकडून कर्ज घेतले जात आहे. यात दवाखाना, मुलांचे शिक्षण, लग्न कार्यासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण अधिक आहे. हा व्यवहार करताना कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहार होत आहे. सर्व व्यवहार तोंडी होतो. सावकाराने पैशासाठी तगादा लावल्यानंतर अनेकजण तक्रार घेऊन पोलिसात येतात. गुन्हा दाखल करण्याची वेळ आली की तक्रारदार आणि सावकार हे दोघेही मागे सरकतात. आपापसात प्रकरण मिटवून घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाप्रकरणांमध्ये कारण नसताना पोलिसांचा वेळ जात असल्याचे समोर आले आहे. सावकारांना भीती दाखविण्यासाठी पोलिसांचा वापर होतोय हे यावरून सिद्ध होते. 

आकडे बोलतात.. 
प्राप्त तक्रारी - 131 
निकाली काढलेल्या तक्रारी - 125 
गुन्हे दाखल केले - 3

Web Title: esakal marathi news police news solapur