'स्मार्ट' शहरातील कत्तलखाना हलणार कधी? 

मल्लिकार्जुन मुगळी
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कत्तलखाना बांधण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, पण योग्य जागा मिळालेली नाही. आता जागा खरेदी करण्यास जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर जागा खरेदी केली करून कत्तलखाना बांधला जाईल. 
-डॉ. शशीधर नाडगौडा. आरोग्याधिकारी, महापालिका. 

बेळगाव, ता. 18 ः शहर 'स्मार्ट' करण्यास निघालेल्या महापालिकेला सहा वर्षात शहरातील कत्तलखाना बंद करणे शक्‍य झालेले नाही. कसाई गल्लीत कत्तलखाना असून, पर्यायी दोन जागांची निवड करून सहा वर्षे उलटली तरी कत्तलखाना शहराच्या मध्यवर्ती भागातच सुरू आहे. त्यामुळे तो हलवण्याची जबाबदारी घेणार कोण, हा प्रश्न आहे. महापालिका प्रशासन फक्त जागेच्या समस्येकडे बोट दाखवून स्वस्थ बसले आहे. 

गुरुवारी झालेल्या महापालिका बैठकीच्या अजेंड्यावर कत्तलखान्याचा विषय होता. पण चर्चेला विषय आला नाही. कसाई गल्ली व परिसरात जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या शहरवासीयांच्या समस्यांबाबत नगरसेवक संवेदनशील नाहीत, अशी तक्रारही आता होऊ लागली आहे. कत्तलखान्यासाठी 2013-14 या आर्थिक वर्षात तब्बल 1 कोटी रूपये निधी राखीव ठेवला आहे. त्या निधीतून जागा खरेदी करण्यात येणार आहे. 
प्रदूषण नियंत्रण मंडळाने कसाई गल्लीतील कत्तलखान्याचे स्थलांतर करण्याची सूचना महापालिकेला दिलेली आहे. कत्तलखाना शहराबाहेर व्हायला होणे आवश्‍यक आहे. सहा वर्षापासून जास्त काळ महापालिका प्रशासन कत्तलखान्यासाठी जागेचा शोध घेत आहे. पण अद्यापही योग्य जागा सापडलेली नाही. 

बेळगाव तालुक्‍यातील हालभावीत कत्तलखान्यासाठी 20 एकर जागा महापालिकेसाठी मंजूर झाली होती. 2011 मध्ये महापालिकेने 18 लाख रूपये भरून ती जागा ताब्यातही घेतली. पण त्या जागेजवळच तलाव असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कत्तलखान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. शिवाय हालभावीत कत्तलखाना होवू नये यासाठी राजकीय दबावही आणला गेला. हालभावीची जागा नंतर आयटीबीपीसाठी देण्यात आली. 

कत्तलखान्यासाठी महापालिकेने ऑटोनगरमधील एक जागा निवडली होती. कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाची ती जागा कत्तलखान्यासाठी मिळावी असा प्रस्ताव पाठवला होता. पण महामंडळाने तो प्रस्ताव मंजूर केला नाही. त्या जागेवरून उच्चदाबाच्या वीजवाहिन्या जातात, असे सांगून पालिकेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. 

महापालिकेने कत्तलखान्यासाठी योग्य जागा विकत घेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडे मागितली. त्यावर सभागृह तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी जागा विकत घ्यावी, असे प्रशासनाकडून महापालिकेला कळविण्यात आले. पण निधी असूनही कत्तलखाना बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातच चालतो. त्यामुळे स्थलांतराची जबाबदारी घेणार कोण, हा प्रश्न आहे. 
 

Web Title: esakal news belgaon news

टॅग्स