कोल्हापूर- फिफा वर्ल्ड कपच्या सेल्फी पॉइंटचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

महापालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित महापालिकास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कपच्या सेल्फी पॉइंटचे उद्‌घाटन झाले. याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी खेळाडू व पालकांची रेलचेल राहिली.

कोल्हापूर : परदेशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय असला, तरी भारतात तशी स्थिती नाही. देशातील सरकार हा खेळ रूजविण्यासाठी प्रयत्नशील असताना आपण मागे राहून चालणार नाही. त्यासाठी या खेळात पाल्यांना गोडी लावण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. या खेळातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी झेप घेता येते, हे कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याने दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

महापालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित महापालिकास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कपच्या सेल्फी पॉइंटचे उद्‌घाटन झाले. याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी खेळाडू व पालकांची रेलचेल राहिली. विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर कार्यक्रम झाला. 
मालोजीराजे म्हणाले, ""फुटबॉलचा खेळ भारतात रूजावा, यासाठी देशातील सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी फुटबॉलच्या प्रसारासाठी हाती घेतलेली मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कोल्हापुरात फुटबॉल शंभर वर्षांपूर्वीपासून खेळला जात आहे. शहरात शेकडो फुटबॉल संघ असून, त्यामधून हजारो खेळाडू खेळत आहेत. अनिकेत जाधवसारखा मध्यमवर्गीय फुटबॉलपटू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करत आहे.'' 

जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी "महाराष्ट्र मिशन वन मिलियन' या उपक्रमामागील हेतू स्पष्ट करत, उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांना प्रत्येकी पाच फुटबॉल देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी शाळांची नावे मागवली असल्याचे सांगितले. या प्रसंगी प्रशासनाधिकारी विश्‍वास सुतार, शिक्षणाधिकारी बाबासाहेब भंडारे, केएसएचे सरचिटणीस माणिक मंडलिक, शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव आर. बी. बुवा, क्रीडाधिकारी राजेंद्र घाडगे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, नाना पाटील, उदय घोरपडे, प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण, सुनील पोवार, योगेश हिरेमठ, अमित साळोखे, अजित पोवार, गौरव माने, श्रेयश मोरे, पंकज राऊत, अवधूत गायकवाड उपस्थित होते. 

सेल्फी पॉइंटवर झळकला अनिकेत... 
सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याचा समावेश आहे. त्याचे छायाचित्र सेल्फी पॉइंटवर उभारलेल्या डिजिटल फलकावर झळकले आहे. 

सेल्फी पॉइंटच्या उद्‌घाटनानंतर मैदानावर महापालिकास्तर फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत सहभागी शाळांतील खेळाडूंची सेल्फी पॉइंटवर दिवसभर सेल्फी घेण्यासाठी रेलचेल राहिली. 

Web Title: esakal news kolhapur news football news