अंबाबाई मंदिरातील वाद : आता ज्येष्ठांनीच पुढे येऊन फोडावी कोंडी 

सुधाकर काशीद
शनिवार, 1 जुलै 2017

अंबाबाईला आम्ही मानतो. देवीमुळे कोल्हापूरची धार्मिक क्षेत्रात वेगळी ओळख आहे. ही ओळख कायम राहिली पाहिजे. काही पुजाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. त्यामुळे आम्ही पुजाऱ्यांना हटवणार हे ठरलेले आहे. 
पण तो राग संपूर्ण ब्राह्मणांवर नक्कीच नाही. 
-संजय पवार (कृती समिती सदस्य )

कोल्हापूर- करवीरनिवासिनी अंबाबाईला घागरा-चोळीचा पेहराव केल्याने संतापाची भावना जरूर आहे. पुजारी, देवस्थान समितीच्या कारभाराबाबतही राग दबून राहिलेला आहे. हा राग गेल्या काही दिवसांत या ना त्या मार्गाने व्यक्त होऊ लागला आहे. 

पण पुजाऱ्यांच्या विरोधातली ती भावना ब्राह्मणांना टार्गेट करू लागली आहे. चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला, असा हा प्रकार आहे. त्यामुळे मराठा व ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ व कोल्हापुरातील इतर दिग्गजांनी पुढे येऊन ही कोंडी फोडण्याची गरज निर्माण झाली आहे. 

काही पुजाऱ्यांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे प्रत्येक कोल्हापूरकर समर्थन करतोच आहे. पण या आंदोलनाआडून दोन्ही बाजूंनी जे काही सुरू झाले आहे ते एकमेकांच्या भावना कलुषित करणारे आहे. अजूनही कोल्हापुरात अशी काही माणसे आहेत की, त्यांनी आता यात भाग घेण्याची गरज आहे. पुजाऱ्यांच्या संदर्भातले आंदोलन व देवस्थान समितीतील गैरव्यवहार या दोन मुद्द्यांवरच हे केंद्रित झाले तर ठीक आहे; अन्यथा याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. भाविकांत जर चुकीचा संदेश गेला तर पुजारी सोडाच येथील हॉटेल, रिक्षा, यात्री निवास, पूजासाहित्य, उपाहारगृहे, कोल्हापुरी दागिने, कोल्हापुरी चप्पल व आजूबाजूच्या पर्यटनावरही मोठा परिणाम होणार आहे. कोल्हापूरला अंबाबाईचा वारसा साधारण सहाव्या-सातव्या शतकापासून आहे. कोल्हापूरला उद्योग, शेती, इतिहास यांचा जसा वारसा आहे तसे धार्मिक अधिष्ठानही आहे. गेल्या काही वर्षांत भाविकांचा ओघही वाढतो आहे. 

यापूर्वी केवळ नवरात्राच्या काळात देवीच्या दर्शनासाठी लागणारी रांग आता बारा महिने आहे. पूर्वी एक महालक्ष्मी धर्मशाळा होती. आता 150 यात्री निवास झाले आहेत. काळे फुटाणे व खडी-साखर एवढा साधा देवीचा प्रसाद आता तुपातला लाडू झाला आहे. 

देवीच्या नवरात्रातल्या पूजा सोडून इतर पूजाही आकर्षक पद्धतीने मांडल्या जाऊ लागल्या आहेत. 
देवीची लाकडी पालखी सोन्याची आणि लाकडाचा रथ चांदीचा झाला आहे. देवीचा रथ दिवटीच्या प्रकाशाऐवजी लेसर किरणांच्या लखलखाटात निघू लागला आहे. उन्हाने न तापणारी फरशी असा गवगवा करीत मंदिराच्या आवारात 89 लाख रुपये खर्च करून फरशी बसवली आहे. 
देवीच्या मूर्तीवर गेल्या वर्षी रासायनिक संवर्धन केले गेले आहे. पण त्याचे "रहस्य' एका कॅमेऱ्यात बंद आहे. सर्वांसमोर हे रहस्य आले तर क्षोभ उसळेल, अशी चर्चा आहे. याशिवाय देवस्थान समितीचा कारभार रोज चर्चेत आहे. याहीपेक्षा देवीच्या मूर्तीची नेमकी स्थिती या क्षणी कशी आहे हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाचे धाडस होत नाही, हे वास्तव आहे. 

या परिस्थितीत देवीच्या पूजेसाठी केलेला पेहराव हे असंतोषाच्या उद्रेकाचे निमित्त ठरले. वेगवेगळ्या मार्गांनी हा उद्रेक व्यक्त झाला. भाविकांनीही हा उद्रेक नैसर्गिक असे मानून आंदोलनाचे समर्थन केले. पण आता हे आंदोलन कोणीतरी अन्य दिशेला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. ब्राह्मण हे टार्गेट करून गोंधळ सुरू आहे. पुण्यातील ब्राह्मण संघटनेनेही चुकीची विधाने करून यात भर घातली आहे. पण याचा परिणाम कोल्हापुरातील सामाजिक सलोख्यावर होत आहे. ज्यांच्यामुळे हे घडले त्यांना शासन व्हावे आणि हे कोठेतरी थांबावे, अशीच बहुतेक कोल्हापूरवासीयांची भावना आहे. 

"कोल्हापुरातील प्रकरणावर पुण्यातील एका कार्यक्रमात विश्‍वजित देशपांडे, आनंद दवे यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या त्यांच्या वैयक्तिक आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा त्याला बिलकुल पाठिंबा नाही. शाहू महाराजांच्या नगरीत सर्व जाती-धर्मांची लोकं गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशा वेळी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे व सलोख्याचे वातावरण बिघडवू देऊ नये."
-शाम जोशी (राष्ट्रीय महासचिव, ब्राह्मण महासंघ )

Web Title: esakal news kolhapur news mahalakshmi mandir news