'जीएसटी'बाबत भूलथापांना बळी पडू नका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मजुरीने बिमे आणणाऱ्या कारखानदारांनी मजुरी व त्यावरील जीएसटी कर वेगळा लागेल, असे ट्रेडिंग कंपनीधारकांना स्पष्ट शब्दात सांगावे. त्याचबरोबर कापडाचे पेमेंट घेताना पूर्ण रकमेचे चेक घ्यावेत. पाच टक्के किंवा काही रक्कम शिल्लक ठेवून चेक घेऊ नये. यासंदर्भात काही अडचण आल्यास इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे. 

इचलकरंजी : 'जीएसटी' कर प्रणालीबाबत सुरू असलेल्या वातावरणाचा गैरफायदा काही व्यापारी व दलाल घेत आहेत. त्यामुळे यंत्रमागधारकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. आपले सर्व दैनंदिन व्यवहार "जीएसटी' कर प्रणालीचा वापर करून पूर्ण करावेत, असे आवाहन यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतचे पत्रक अध्यक्ष विनय महाजन यांनी दिले आहे. 

देशात 1 जुलैपासून 'जीएसटी' ही नवीन कर प्रणाली लागू झाली आहे. देशातील वस्त्रोद्योगाच्या काही प्रमुख केंद्रांच्या ठिकाणी "जीएसटी' प्रणालीतील किचकट तरतुदी हटविण्यासाठी व्यापारी वर्गाने बंद पुकारला आहे; पण इचलकरंजीमध्ये यंत्रमागधारक व व्यापारी वर्गाने अद्यापही रितसर कायदेशीर मार्गाने आपली खरेदी - विक्री सुरू ठेवलेली आहे. त्यामुळे येथील व्यवहार थांबलेले नाहीत. याचा गैरफायदा काही व्यापारी व दलाल घेत आहेत. 

कापड विक्री करताना 1 जुलैपूर्वी बुकिंग केलेल्या दरामध्ये 5 टक्के जीएसटी अधिक करायचा आहे. काही व्यापारी आणि दलाल या बुकिंगच्या दरातच "जीएसटी'ची बिले देण्याची मागणी करीत यंत्रमागधारकांची फसवणूक करीत आहेत. जीएसटी सोडून राहिलेली रक्कम देऊ, अशी अडेलतट्टू भूमिका काही व्यापारी घेत आहेत. काही ठरावीक व्यापारी हे यंत्रमाग कारखानदारांवर दबाव व भीती आणून कापडाचा दर कमी करण्याचा प्रयत्न आपल्या दलालांमार्फत करीत आहेत, असा आरोप यंत्रमागधारक जागृती संघटनेने केला आहे. जर कोणी व्यापारी जीएसटीची भीती घालून फसवणूक करीत असतील तर यंत्रमागधारक जागृती संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. महाजन यांनी केले आहे. 

पॉवरलूम असोसिएशनचेही आवाहन 
मजुरीने बिमे आणणाऱ्या कारखानदारांनी मजुरी व त्यावरील जीएसटी कर वेगळा लागेल, असे ट्रेडिंग कंपनीधारकांना स्पष्ट शब्दात सांगावे. त्याचबरोबर कापडाचे पेमेंट घेताना पूर्ण रकमेचे चेक घ्यावेत. पाच टक्के किंवा काही रक्कम शिल्लक ठेवून चेक घेऊ नये. यासंदर्भात काही अडचण आल्यास इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केले आहे. 

Web Title: esakal news sakal news GST