१४ वर्षीय मुलाने वाचवला कालव्यात पडलेल्या विद्यार्थिनीचा जीव

अर्जुन शिंदे
मंगळवार, 25 जुलै 2017

जाधववाडी येथे कुकडी डाव्या कालव्यावरील पुलाचा एका बाजूचा लोखंडी कठडा तुटल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना या पुलावरून जगदंबा माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जावे लागते. येडगाव धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने कुकडी डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलेले आहे.

जाधववाडी(ता. जुन्नर)- आज (दि. २५) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कुकडी कालव्यावरील पुलावरून सायकलवरून शाळेत जात असताना इयत्ता ५ वी तील विद्यार्थिनी तोल जाऊन सायकलसह कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडली. यावेळी सोबत शाळेत चाललेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथून जात असलेल्या सुमारे १४ वर्षे वयाच्या इयत्ता ८ वी तील एका शाळकरी विद्यार्थ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून कालव्यात उडी मारली व पोहोत जाऊन त्या विद्यार्थिनीस वाचवले.

जाधववाडी येथे कुकडी डाव्या कालव्यावरील पुलाचा एका बाजूचा लोखंडी कठडा तुटल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना या पुलावरून जगदंबा माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जावे लागते. येडगाव धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने कुकडी डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलेले आहे. आज (दि.२५) सकाळी मुस्कान बशीर पठाण ही इयत्ता ५ वी त शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सायकलवरून शाळेत चालली होती. पुलावरून जात असताना तॊल जाऊन ती सायकलसह कालव्याच्या पाण्यात पडली. यावेळी तेथून जात असलेल्या वैभव सुनील गायकवाड या इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने क्षणाचाही विलंब न लावता कालव्यात उडी मारली. पाण्यात वाहून जात असलेल्या मुस्कानला पकडून त्याने कालव्याच्या कडेला आणून सुरुवातीला एका झाडाचा आधार घेतला. त्यानंतर पाईपलाईनच्या पाईपच्या आधाराने ग्रामस्थांच्या मदतीने तिला पाण्याबाहेर काढले.

१४ वर्षे वयाच्या वैभव गायकवाड याने आपल्याच शाळेतील इयत्ता ५ वी तील मुस्कान पठाण या विद्यार्थिनीस वाचवल्याने संस्थेचे अध्यक्ष एस. आर. शिंदे, मुख्याध्यापक एस. ए. कसाळ, राजेंद्र पायमोडे, रामदास जाधव आदींसह शाळेतील शिक्षकांनी वैभवचा जाहीर सत्कार करून त्याचे कौतुक केले. कुकडी कालव्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटल्याने तो धोकादायक बनला असून, या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.             

Web Title: esakal news sakal news junnar news