...आणि उदयनराजे रागाने म्हणाले शट्‌ अप !

Udayanraje
Udayanraje

सातारा : निष्ठावंत समर्थकांसह खासदार उदयनराजे भोसले पुण्यातून काल (सोमवारी) रात्री साताऱ्यात आले. ते साताऱ्यात आहेत याची कोणालाही माहिती नव्हती. रात्रभर उदयनराजे निवडक समर्थकांसह सातारा शहर परिसरात फिरत होते. त्यानंतर एका खासगी ठिकाणी मुक्काम केला. मंगळवारी (ता. 25) सकाळी लवकर उठले अन्‌ सकाळी साडे सात वाजता ते त्यांच्या फोर्ड गाडीने सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी आले. 

त्यांच्यासमवेत निवडक चार ते पाच कार्यकर्ते होते. उदयनराजे एकटेच शहर पोलिस निरिक्षकांच्या केबिनमध्ये बसून राहिले. त्यावेळी पोलिस ठाण्यात कर्मचारी व अधिकारी नव्हते. थोडावेळ वाट पाहून त्यांनी जलमंदीर या त्यांच्या निवासस्थानात जाणे पसंत केले. निवासस्थानात ते साधारण तासभर थांबल्यानंतर पुन्हा सकाळी नऊ वाजता ते त्यांच्या फोर्ड गाडीतून सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी त्यांनी पांढरा शर्ट व पिवळसर रंगाची जिनची पॅण्ट घातली होती. 

पोलिस ठाण्याच्या दारात गाडी लावल्यानंतर ते गाडीतून उतरून कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांना पाहून एका अधिकाऱ्याने त्यांना आनंदाच्या भरात मिठी मारली. त्यानंतर ते खूर्ची बसले. पोलिस कर्मचाऱ्यांनी कागदोपत्री अटकेची कारवाई सुरू केली. साधारण अर्धातासानंतर उदयनराजे त्यांच्याच गाडीतून सातारा तालुका पोलिस ठाण्याकडे जाण्यास निघाले. त्यावेळी पोलिस ठाण्याबाहेर थांबलेल्या त्यांच्या समर्थकांनी त्यांची छबी मोबाईलमध्ये कॅच करण्याचा प्रयत्न केला. तर काही समर्थक त्यांच्या गाडीच्या मागेच धावत होते. 

सातारा तालुका पोलिस ठाण्यात उदयनराजे साधारण अर्धातास थांबले. तोपर्यंत त्यांच्या समर्थकांना उदयनराजे नेमके कुठे आहेत हे समजल्याने सातारा शहरातून फिरणारे त्यांचे समर्थक थेट तालुका पोलिस ठाण्याच्या बाहेर येऊन थांबले. यावेळी दोन पोलिस गाड्या व उदयनराजे यांना अतिरिक्त पोलिस अधिक्षकांच्या गाडीतून न्यायालयात नेण्यात आले. 

पोवईनाक्‍यावरून जिल्हा न्यायालयात हा ताफा गेला. जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी केवळ पोलिसांची वाहने व उदयनराजे बसलेली इनोव्हा गाडी सोडली. त्यांचे समर्थक बाहेरच थांबले होते. साडे अकरा वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त व खासदार समर्थकांची गर्दी होती. जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू होऊन त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. उदयनराजे न्यायालयातून बाहेर आले, त्यावेळी समर्थकांनी त्यांना गराडा घातला. या गराड्यातून वाट काढत ते त्यांच्या इनोव्हा गाडीकडे निघाले पण त्या गाडीत बसण्याऐवजी ते पोलिस अधीक्षकांच्या गाडीत बसू लागले. यावेळी एकाने त्यांना या गाडीत बसा असे सांगताच ते रागाने शट अप्‌ ... असे म्हणाले आणि अधिक्षकांच्या गाडीचे दार उघडून बसले. तेथून ते जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com