स्त्रीशिक्षणाचा पाया एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूल

डॅनियल काळे
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कोल्हापूर - येथील पहिली मुलींची शाळा म्हणून एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूल या शाळेचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळचे तिसरे शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई व बाळाबाई यांच्या साहाय्याने ही शाळा उभारली.

कोल्हापूर - येथील पहिली मुलींची शाळा म्हणून एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूल या शाळेचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळचे तिसरे शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई व बाळाबाई यांच्या साहाय्याने ही शाळा उभारली.

सुरवातीला राजवाड्यात भरणारी ही शाळा काही काळाने स्वतंत्र विस्तीर्ण जागेत सुरू झाली. या शाळेत राजघराण्यातील, तसेच सामान्य घरातीलही अनेक मुलींनी शिक्षण घेतले. भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत. कोल्हापुरात स्त्रीशिक्षणाचा पाया घालणारी शाळा म्हणून या शाळेचे योगदान मोठे आहे. 

१८५० च्या सुमाराचा तो काळ शिक्षणासाठी आणि त्यातल्या त्यात महिलांच्या शिक्षणासाठी अंत्यत प्रतिकूल होता. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनाही विरोध झाला. त्या पाठोपाठ काही वर्षांतच कोल्हापुरातही मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आली. १८५२ च्या सुमारास कोल्हापूर रेव्ह. रॉयल गोल्ड वायल्डर व त्यांच्या पत्नी हे अमेरिकन मिशनरी दाम्पत्य कोल्हापूरला आले. त्यांनी तत्कालीन तिसरे शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी आऊबाई व बाळाबाई यांच्या सहाय्याने जुन्या राजवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. रेव्ह. वायल्डर यांच्या पत्नी त्या वेळी या दोघींना शिकवत होत्या.

काही वर्षांनी एस्तेर पॅटन ही २२ वर्षांची अमेरिकन तरुणी कोल्हापुरात आली. त्यांनी येथील स्त्रिया अशिक्षित असल्याचे पाहिले आणि त्यावेळी त्यांनी मिसेस वायल्डर यांच्या सहाय्याने मराठी भाषा अवगत केली व छोट्याशा झोपडीत शिक्षणाचे कार्य सुरू केले. या वेळी काही प्रमाणात त्यांनाही विरोध झाला; पण हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. शाळेबरोबर काही मुलींच्या राहण्याचीही व्यवस्था करण्याची वेळ एस्तेर पॅटन यांच्यावर आली. बाबासाहेब महाराज तसेच त्यापुढच्या काळात छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीमुळे जागा मिळाली आणि याच जागेवर इमारतही बांधली आहे. 

वस्तीगृहासाठी मदतीची गरज
एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूलचे एक वसतीगृह आजही सुरु आहे. अत्यंत गरीब मुली येथे मोफत शिक्षण घेतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था वसतीगृहात आहे,पण हे वसतीगृह चालविताना संस्थेचीही अर्थिक ओढाताण होते. त्यामुळे या वस्तीगृहासाठी मदतीची गरज आहे. शाळेच्या माजी विद्यार्थीनी, शिक्षक, हितचिंतक व समाजातील दानशूर व्यक्तींनी या वस्तीगृहाला मदत करावी, अशी अपेक्षाही कोल्हापूर चर्च कौन्सिल या संस्थेतर्फे केली आहे.

१६ ऑगस्ट एस्तेर पॅटन दिन
१८९८ ला प्लेगची महाभयंकर साथ आली. या साथीत वसतिगृहातील काही मुली आजारी पडल्या. त्यांची सेवा एस्तेर पॅटन करत होत्या. त्यानंतर त्यादेखील आजारी पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. १६ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस एस्तेर पॅटन दिन म्हणून शाळेत साजरा केला जातो.

Web Title: Esther Patton Girls High School special story