'वंचित'ने थांबवलेला ईव्हीएमचा कंटेनर पुण्याला रवाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

- ईव्हीएम हटाव अन्‌ देश बचावची घोषणाबाजी 
- सखोल चौकशीचीही मागणी 

सोलापूर : बंगळूरुहून दोन हजार 800 ईव्हीएम घेऊन दोन कंटेनर सोलापूरमार्गे जळगाव व पुण्याला निघाले होते. पुण्याला जाणारा कंटेनर सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे मुक्‍कामी असल्याची माहिती मिळताच त्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांनी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार तो कंटेनर सोमवारी (ता. 12) अडविला. परंतु, पोलिस चौकशीनंतर तो सोडून देण्यात आला. या वेळी "वंचित'च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा दिल्या. 

वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती असल्याने शासकीय विश्रामगृहाची पाहणी करण्याच्या निमित्ताने चंदनशिवे रविवारी रात्री तिथे गेले होते. त्या वेळी त्यांना शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या कंटेनरमध्ये ईव्हीएम असल्याची माहिती मिळाली. तत्काळ त्यांनी ऍड. आंबेडकर यांच्याशी संपर्क करून तो कंटेनर थांबवून ठेवला. काही वेळातच त्याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा जमा झाला.

दरम्यान, या कंटेनरसमवेत तहसीलदार, सहा तलाठी, चार शस्त्रधारी पोलिस, पाच कोतवालांचा फौजफाटाही होताच. परंतु, सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती असतानाही सरकार निवडणुकीची तयारी करीत आहे. या मशिन हॅक केलेल्या आहेत की नव्या, याची चौकशी व्हावी, अशी मागणी या वेळी चंदनशिवे यांनी केली. तर लोकसभा निवडणुकीत बिघाड झालेल्या मशिन परत करून बंगळूरूहून नव्या मशिन रीतसर कागदपत्रांसह घेऊन निघालो असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिले. 

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांनी सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी थांबलेला ईव्हीएमचा कंटेनर थांबवून ठेवला होता. मात्र, चौकशीनंतर तो पुण्याला रवाना करण्यात आला. याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. - राजेंद्र बहिरट, पोलिस निरीक्षक, सदर बझार पोलिस ठाणे, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EVM container stopped by Wanchit Aghadi departs for Pune