अत्याधुनिक ‘ईव्हीएम’चे गावोगावी प्रात्यक्षिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नगर - देशात होणाऱ्या निवडणुकांत जुन्या ईव्हीएम वापरण्यात आल्याने वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबद्दल संशय व्यक्‍त करून राजकीय आरोपही होत आले आहेत. त्यामुळे प्रशासनालाही फेरमतदान घेण्याची वेळ येते. यासाठी निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता अत्याधुनिक ‘एम-३ ईव्हीएम’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमला व्हीव्हीपॅट यंत्रही जोडण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे मतदाराला चिठ्ठीद्वारे कळणार आहे.

नगर - देशात होणाऱ्या निवडणुकांत जुन्या ईव्हीएम वापरण्यात आल्याने वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबद्दल संशय व्यक्‍त करून राजकीय आरोपही होत आले आहेत. त्यामुळे प्रशासनालाही फेरमतदान घेण्याची वेळ येते. यासाठी निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता अत्याधुनिक ‘एम-३ ईव्हीएम’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएमला व्हीव्हीपॅट यंत्रही जोडण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे मतदाराला चिठ्ठीद्वारे कळणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले असून, गावोगावी जाऊन जनतेला, नववर्षात एक जानेवारीपासून अत्याधुनिक ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.  

जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी दोन, याप्रमाणे एकूण २४ मतदान यंत्रे देण्यात येणार आहेत. जनजागृतीची मोहीम एक जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार असून, तब्बल दीड महिना ती सुरू राहणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आठ हजार २० बॅलेट युनिट (बीयू) व चार हजार ६६३ कंट्रोल युनिट (सीयू) जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाली आहेत. या यंत्रांसोबत जोडण्यासाठीची चार हजार ६६३ व्हीव्हीपॅट यंत्रेही जिल्ह्याला मिळाली आहेत. या सर्व यंत्रांची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. विधानसभा मतदारसंघनिहाय दोन यंत्रे दिली जातील. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी दिलेल्या यंत्राचा क्रमांक प्रत्येक राजकीय पक्षाला कळविण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी प्रत्येक यंत्रासोबत चार जणांची ‘टीम’ असणार आहे. तीमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश असेल. 

ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांना आव्हान
गावोगावी ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यात ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी ही यंत्रणा समजून घेण्याचे आवाहन आहेच; पण प्रशासनाचे मशिन ‘हॅक’ करण्याचा दावा करणारे व यंत्रात गडबड करण्याचा आरोप करणाऱ्यांना तो सिद्ध करण्याचे आव्हानही आहे.

नवीन वर्षाचे स्वागत ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकाने करण्यात येणार आहे. त्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा बिगूल खऱ्या अर्थाने वाजेल. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कल्पनेतून एक जानेवारीचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला आहे.
- अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title: EVM Demonstration village to village