माढ्यात भाजपला खिंडार ; साठे पिता-पुत्रांची घरवापसी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

माढ्यात सत्तांतर 
माढा नगरपालिकेत साठे गटाचे बहुमत आहे. नगराध्यक्षांसह हे सर्व नगरसेवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने माढा नगरपालिकेवर आता कॉंग्रेसचा झेंडा फडकणार आहे. तसेच माढा तालुक्‍यात कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. 

सोलापूर ः राज्यातील सत्तांतरानंतरचे परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. माढ्यातील माजी आमदार धनाजी साठे यांनी पुत्र दादासाहेब साठे यांच्यासह आज (गुरुवारी) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला माढ्यात खिंडार पडली आहे. 

हेही वाचा - दरवर्षी पैसे नेतात, बिल देतच नाहीत

काॅंग्रेस भवनात झाला प्रवेश 
विधानसभेच्या 2014 मध्ये निवडणुकीवेळी उमेदवारी नाकारल्याने श्री. साठे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपचाच प्रचार केला. माढा नगरपालिकेत 17 पैकी 11 नगरसेवक निवडून आणून सत्ता आणली. नगराध्यक्षपदी सध्या त्यांच्या स्नुषा ऍड. मीनल साठे या आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यावर कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे साठे यांनी कॉंग्रेस प्रवेशासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी श्री. शिंदे यांच्याशी चर्चा करून प्रवेश निश्‍चित केला आणि आज कॉंग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

हेही वाचा - जन्म दाखल्यावर नोंदीसाठी अखेरची संधी 

मान्यवर उपस्थित 
प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार ऍड. रामहरी रूपनवर, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महापालिकेतील गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, शिवलिंग सुकळे, गौरव खरात यांच्यासह कॉंग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या घराण्याचा मूळचा पिंड हा कॉंग्रेसचाच होता. कॉंग्रेसच सर्वांना समान न्याय देऊ शकते, अशी प्रतिक्रिया श्री. साठे यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्र 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mla dhanaji sathe (madha-solapur) return in congress again after five years