
बारावी परीक्षेची धाकधूक वाढली; विद्यार्थी, पालक चिंतेत
बेळगाव : बारावीची परीक्षा जवळ येऊ लागली आहे. तशी विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून परीक्षेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले जात नसल्याचे पालक व विद्यार्थी चिंतेत सापडले आहेत.
बारावीच्या परीक्षेला २४ जूनपासून सुरवात होणार आहे. मात्र, सध्या राज्यात सुरु असलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून कोरोना कर्फ्यू लागू करण्यात आल्याने महाविद्यालये बंद आहेत. तसेच महाविद्यालये उशीरा सुरु झाल्याने अजून अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत परीक्षा कशी देणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. जीवनातील महत्त्वाची परीक्षा असल्याने विद्यार्थी या परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करीत असतात. मात्र, कोरोनामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे गणित मोडून गेल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.
हेही वाचा: चिंताजनक! ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी वैद्यकीय पंढरीचा 'श्वास' गुदमरतोय
महाविद्यालये सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षण खात्याकडून दिली जात आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचे रुग्ण अशाच प्रकारे वाढत राहिले तर परीक्षा घेणे शिक्षण खात्याला अवघड जाणार आहे. गेल्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर सोशल डिस्टंसिंग आणि इतर प्रकारचे नियम पाळून दहावी व बारावी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, सध्या परीक्षा २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, शिक्षण खाते कशाप्रकारे परीक्षा घेणार याबाबतची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
निर्णय लवकर घ्या
पालकांच्या मते सध्याची परिस्थिती पाहता दहा ते पंधरा दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे शिक्षन खात्याने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.
Web Title: Exams 12th Board Students And Parents Face Problem Explanation Not Given From Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..