‘स्पेशल आयजीं’च्या व्हॉटस्‌ॲपमुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सोशल मीडियावरून काही मित्रांना तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला. हा संदेश व्हायरल झाल्यामुळे राज्याच्या पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव रविवारी (ता. ६) अमरावती येथील कॅंप परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यांनी सायंकाळी सोशल मीडियावरून एक संदेश आपल्या काही मित्रांना पाठविल्याची चर्चा आहे. त्यात आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही होता, असे सांगण्यात येत आहे.

कोल्हापूर - वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सोशल मीडियावरून काही मित्रांना तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला. हा संदेश व्हायरल झाल्यामुळे राज्याच्या पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव रविवारी (ता. ६) अमरावती येथील कॅंप परिसरातील आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यांनी सायंकाळी सोशल मीडियावरून एक संदेश आपल्या काही मित्रांना पाठविल्याची चर्चा आहे. त्यात आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही होता, असे सांगण्यात येत आहे.

जाधव पूर्वी सातारा येथे पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षक पदाचाही कार्यभार दोन-तीन महिने होता. ते वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळले होते. मराठा असल्याने अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रचंड त्रास दिला जात असून, या त्रासाला कंटाळूनच आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे व्हायरल झालेल्या संदेशात म्हटले आहे.

यावर्षी ५ जुलैला त्यांची विदर्भात नियुक्ती झाली. त्यानंतर १५ जुलैला त्यांनी वरिष्ठांना अर्ज करून माझ्या अधिकारात इतर आयपीएस अधिकारी हस्तक्षेप करत असल्याची तक्रार केली होती. पोलिस महासंचालकांच्या सांगण्यावरूनच हा प्रकार सुरू असून, माझ्याबरोबर एखाद्या आरोपीच्या नजरेतून व्यवहार सुरू असल्याचे व्हायरल झालेल्या संदेशात म्हटले आहे. मला रक्तदाबाचा त्रास असून येथे वरिष्ठांना मी नको असेन तर त्यांनी माझी बदली पुणे येथे करावी असाही अर्ज केला आहे; पण त्यातूनही मला त्रास देण्याचा प्रकार सुरूच आहे, त्यामुळे आत्महत्या करण्याचा इशारा या व्हायरल झालेल्या संदेशात दिला आहे.

हा संदेश पोलिस महासंचालकांबरोबरच काही ओळखीच्या पत्रकारांनाही मिळाला आहे. एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यालाही अशा पद्धतीने त्रास दिला जात असल्याचा प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मराठा नेत्यांनाही मिळाला मेसेज
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, भय्यूजी महाराज, खासदार उदयनराजे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनाही हा व्हायरल झालेला मेसेज मिळाल्याचे समजते.

नाही तर अंत्यसंस्कारालाच या!
रविवारी रात्री त्यांनी त्रास देणारे वरिष्ठ अधिकारी व राज्याच्या पोलिस महासंचालकांना संदेश पाठवला. त्यात आपली बदली पुणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी करा, नाही तर माझ्या अंत्यसंस्काराला पुण्यात या, असे लिहिले आहे. ‘या आत्महत्येला तुम्हीच जबाबदार असून माझ्या कुटुंबीयांसह इतरांना तुम्ही दिलेल्या त्रासाची माहिती दिली आहे,’ असेही या व्हायरल झालेल्या संदेशात म्हटले आहे.

पंधरा दिवसांपासून संवादच नाही - माथूर
विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मित्रांना आत्महत्येसंदर्भातील संदेश पाठविला. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यासोबत संवाद नसल्याने कामासंदर्भात रागावण्याचाही प्रश्‍नच नाही. असे असताना सोशल मीडियावरून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने असा संदेश पाठविणे ही बाब पोलिस दलासारख्या शिस्तप्रिय व्यवस्थेला शोभणारी नाही. त्यांची वर्तणूक चुकीची होती, असे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.

जाधव यांचा बोलण्यास नकार
अमरावती - विठ्ठल जाधव यांच्याशी सोमवारी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. दुपारी साडेबारापर्यंत जाधव आपल्या कार्यालयात आले नाहीत. बैठकीसाठी काही पोलिस निरीक्षक दोन तासांपासून त्यांच्या प्रतीक्षेत होते. जाधव आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Web Title: excitement by inspector general whatsapp message