सोलापुरात शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर येथील हेरिटेज गार्डन येथे शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन आयोजित केले आहे. 

सोलापूर : राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्या संकल्पनेतून दिल्ली येथील सांसा फाऊंडेशनच्यावतीने बुधवार 26 ते शुक्रवार 28 सप्टेंबर या कालावधीत गांधीनगर येथील हेरिटेज गार्डन येथे शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शन आयोजित केले आहे. 

हेरिटेज गार्डन येथे 26 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. शासकीय अधिकारी स्टॉलमध्ये माहिती सांगणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान, तंत्रज्ञान व शोधप्रयोगाचेही या महाप्रदर्शनात प्रयोग मांडण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट प्रयोगांना पारितोषिके देऊन गौरविण्यातही येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले असेल. शुक्रवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत व प्रदर्शनाचे प्रवर्तक खासदार अमर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली या महाप्रदर्शनाचा समारोप होईल. यापूर्वी दिल्ली, राजस्थान, काश्‍मीर अशा विविध राज्यांमध्ये अशी प्रदर्शने झाली आहेत, अशी माहिती आयोजक प्रिया दुबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस एम. एम. भास्कर, इव्हेंट को ऑर्डिनेटर दत्ता थोरे उपस्थित होते. 

काय असेल महाप्रदर्शनात? 
सरकार राबवीत असलेल्या विविध लोकोपयोगी योजना कोणत्या आहेत ? त्याचा लाभ कसा घ्यायचा? सरकार योजनांमधून काय करते आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शनात मिळतील. या महाप्रदर्शनात इस्रो, पारंपारिक व अपारंपरिक ऊर्जा, अणुवीज निर्मिती विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाराष्ट्र वीज विकास संस्था, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा विविध सरकारी खात्यांच्या योजनांची माहिती सांगणारे स्टॉल असणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर? 
सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक नाही असे सांगत येथील विविध कार्यक्रमांना राज्यसभेचे खासदार अमर साबळे हजेरी लावत आहेत. त्यांच्याच पुढाकारातून महाप्रदर्शन होत असले तरी मंगळवारच्या पत्रकार परिषदेला ते स्वत: हजर नव्हते. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या फलकांवर सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांचे छायाचित्र दिसत नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खासदार अमर साबळे यांची छायाचित्रे ठळकपणे दिसत आहेत.

Web Title: exhibition of shining maharashtra at solapur