पुणेकरांसह सातारकरांच्या खिशावर अतिरिक्त भार

संजय साळुंखे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

सातारा-पुणे (स्वारगेट) विनावाहक विनाथांबा बससेवेत आजपासून (शुक्रवार) एसटी महामंडळाने केला बदल. या बदलामुळे प्रवाशांना आर्थिक भार साेसावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
 

सातारा ः सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सातारा-पुणे (स्वारगेट) विनावाहक विनाथांबा बससेवेत आजपासून आणखी "शिवशाही' बस सुरू करण्यात आल्या. पूर्वी दर तासाला असणारी "शिवशाही'ची फेरी आता दर अर्ध्या तासाला सुरू करण्यात आल्याने प्रवाशांकडून प्रतिसाद नसतानाही "शिवशाही'चा हा अतिरिक्त डोस देण्यात आला आहे.
 
साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. त्याचा विचार करून तत्कालीन विभाग नियंत्रक प्रतापसिंह सावंत यांनी सातारा-पुणे ही विनावाहक विनाथांबा बससेवा सुरू केली. पहिल्या दिवसापासूनच या सेवेला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला.
त्यामुळे कालांतराने बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. या सेवेचा इतर आगारांच्या फेऱ्यांवर परिणाम होत असल्याचे कारण देत ही बससेवा बंद करण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

मात्र, त्यावेळी प्रवासी संघटना स्थापन करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप करत ही सेवा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आजतागायत ही सेवा अखंडपणे सुरू आहे. याच फेऱ्यांच्या धर्तीवर सातारा-मुंबई, सातारा-बोरिवली या विनावाहक विनाथांबा बससेवा सुरू करण्यात आल्या.

 "शिवशाही' बसला प्रतिसाद नव्हताच 

राज्यात युती शासनाच्या काळात आरामदायी प्रवासासाठी "शिवशाही' बस सुरू करण्यात आल्या. सातारा विभागही त्याला अपवाद नव्हता. "सातारा-पुणे'साठी दर तासाला "शिवशाही' सुरू करण्यात आली. या सेवेचा दर साध्या सेवेपेक्षा (लालपरी) जास्त असल्याने प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. तरीही "वरिष्ठ' पातळीवरून आलेल्या आदेशामुळे प्रवाशांची गैरसोय होत असतानाही ही सेवा सुरूच ठेवण्यात आली. त्यासाठी सहा बस वापरण्यात येत होत्या.

...तरीही शिवशाहीच्या फेऱ्या वाढविल्या

आता त्यात आणखी भर घालण्यात आली आहे. आजपासून "सातारा-पुणे'सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दिवसभरात साध्या बसच्या 40 ऐवजी 28 फेऱ्या होतील, तर "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या होतील. "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या सेवेसाठी 12 "शिवशाही' बस वापरण्यात आल्या आहेत. त्याशिवाय 10 साध्या बसही आहेत.

65 रुपयांचा पडेल भुर्दंड

नवीन वेळापत्रकानुसार पुणे व साताऱ्यातून पहाटे सहापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला (उदा. सहा, साडेसहा, सात वाजता) "शिवशाही' बस सुटेल. तर त्यानंतर दर 15 मिनिटांनी (उदा. सव्वासहा, पावणेसात, सव्वासात वाजता) याप्रमाणे साध्या बस सुटतील. या दोन्ही सेवांतील तिकीट दरात 65 रुपयांचा फरक आहे.

"शिवशाही'चे तिकीट 200 रुपये, तर साध्या बसचा तिकीट दर 135 रुपये आहे. हा हिशोब केला तर "शिवशाही'च्या वाढवलेल्या 16 फेऱ्यांमुळे प्रवाशांना दररोज 44 हजार रुपये जादा द्यावे लागणार आहेत. तरीही "सोयी'चे कारण पुढे करत प्रवाशांना "शिवशाही'चा हा अतिरिक्त डोस देण्यात आला आहे. 

नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त 

"शिवशाही'चा तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत असला, तरी आणखीही तक्रारी करण्यात येत आहेत. या बसमधील एसीचा अनेक प्रवाशांना त्रास होतो.

"शिवशाही' बसचे चालक प्रशिक्षित नाहीत, या बस सातत्याने नादुरुस्त होतात, अशा तक्रारीही प्रवाशांतून होत आहेत. "शिवशाही' नादुरुस्त झाल्यास पर्यायी प्रवास करताना जादा पैसे देऊनही साध्या बसने प्रवास करावा लागतो, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे. 

"सकाळ'ची ठाम भूमिका 

सातारा-पुणे बससेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी ती बंद करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळीही "सकाळ'ने ही सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत ठोस भूमिका घेतली. त्यामुळे ही सेवा सुरू राहिली. सध्याही प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

तरीही "शिवशाही'चा अतिरिक्त डोस देत प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसवण्यासारखा प्रकार सुरू आहे. हा निर्णय प्रवाशांच्या हिताविरोधात आहे. त्यामुळे सातारा-पुण्यासाठी जास्तीत जास्त साध्या बस ठेवाव्यात, या भूमिकेवर "सकाळ' ठाम आहे. महामंडळाने घेतलेला हा निर्णय बदलण्यासाठी प्रवासी, लोकप्रतिनिधी व संघटनांना बरोबर घेऊन "सकाळ' या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extra Burden On The Pocket Of Satarakar And Punekar