निवड चाचणीस भरमसाट शुल्क

संदीप खांडेकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांकडून निवड चाचणीसाठी खेळाडूंकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रतिनिधींशिवायच निवड चाचणीचा सोपस्कार उरकला जात असल्याचे चित्र आहे. खेळाडूंकडून शुल्क किती आकारावे, याचे संघटनांवर बंधन नसल्याची माहिती पुढे आली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांकडून निवड चाचणीसाठी खेळाडूंकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रतिनिधींशिवायच निवड चाचणीचा सोपस्कार उरकला जात असल्याचे चित्र आहे. खेळाडूंकडून शुल्क किती आकारावे, याचे संघटनांवर बंधन नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ऑल इंडिया ऑलिंपिक असोसिएशन व महाराष्ट्र स्टेट ऑलिंपिक असोसिएशनला संलग्नित असलेल्या जिल्हा क्रीडा संघटनेला स्पर्धा आयोजनाचा अधिकार असतो. या संघटनांच्या निवड चाचणी वेळी क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहावे, असे पत्र देणे आवश्‍यक असते. या प्रतिनिधींशिवाय जर निवड चाचणी प्रक्रिया होत असेल तर ती अनधिकृत मानली जाते. बहुतांशी वेळा अधिकाऱ्यांना चाचणीसाठी बोलावले जात नाही. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंकडून २००, ४००, ६०० ते ८०० रुपये असे शुल्क आकारले जाते. एखाद्या खेळाडूची निवड झाल्यानंतर शुल्क आकारणे योग्य असल्याचे क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे.

जपान, कोरिया, चीन, इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय संघटनांना संलग्नित असल्याचा दावा करत काही क्रीडा संघटना निवड चाचणी व स्पर्धा आयोजनातून पैसे मिळविण्याची चढाओढ सुरू असल्याचे दिसते आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालयात अधिकृत ४२ खेळांशी संलग्नित राज्य संघटनांची यादी उपलब्ध आहे. ती न पाहताच पालकवर्गही पाल्याला निवड चाचणीसाठी प्रोत्साहित करत आहेत. पाल्याला मिळालेल्या प्रमाणपत्राच्या अधिकृततेची क्रीडा कार्यालयात जाऊन खातरजमा करण्याची तसदीही पालक घेत नाहीत. संघटना नोंदणीकृत आहे की नाही, याची त्यांना माहितीही नसते.

क्रीडा संघटनेने पत्र दिल्यानंतर निवड समिती पारदर्शक आहे का, तेच सदस्य पुन्हा आहेत का, याची पाहणी केली जाते. पत्र दिले तरच आमचे क्रीडाधिकारी निवड चाचणीच्या ठिकाणी जातात.
- चंद्रशेखर साखरे (जिल्हा क्रीडाधिकारी)

सर्व संघटनांनी शासन व लोक सहभागातून खेळ व खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्यावी. खेळाडूंची विनामोबदला निवड चाचणी घ्यावी.
- दीपक पाटील (प्रशिक्षक, कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशन)

निवड चाचणीसाठी शुल्क आकारणे योग्य नाही. उलट, आमची संघटना निवड झालेल्या खेळाडूंना टी-शर्ट, ट्रॅकसूट व अन्य साहित्य पुरविण्याचे काम करते.
- बिभीषण पाटील (शिवछत्रपती पुरस्कार विजेते)

Web Title: Extra Fees in Selection Test