बनावट नोटा प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता

बनावट नोटा प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता

कोल्हापूर - सांगलीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्यात संशयित गेल्या तीन महिन्यांपासून बनावट नोटा छपाई करत होते. पाचशे, दोनशे व शंभरच्या नोटांची छपाई करण्यावर त्यांचा भर होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संशयितांनी बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणल्या असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे. या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता असून दोघा संशयितांचा पथकांद्वारे शोध सुरू आहे.

गांधीनगर पोलिसांनी बनावट नोटा विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित अभिजित पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७ हजार ५५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा तासगाव (जि. सांगली) येथील विश्‍वनाथ सुहास जोशी व इचलकरंजीतील प्रवीण अजितकुमार उपाध्ये यांनी तयार केल्याची माहिती पुढे आली. या दोघा संशयितांच्या शोधासाठी गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगलीतील शामरावनगर येथील आलिशान बंगल्यात छापा टाकला.

हा बंगला जोशीने भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती तपासात पुढे आली. येथून पोलिसांनी ट्रेसिंग पेपर, केमिकल, नोटा बनविण्यासाठी वापरात येणारा कागद, बनावट नोटांचे कटिंग केलेले तुकडे, प्रिंटरमधील कारटेज जप्त केले. मात्र, बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारा संगणक व प्रिंटर मात्र संशयितांनी गायब केल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही.  संशयित पवारला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अभिजितकडे केलेल्या चौकशीत जोशी व उपाध्ये हे दोघे तीन महिन्यांपासून बनावट नोटा तयार करत होते, शक्‍यतो पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा तयार करण्यावर त्यांचा भर होता, त्यांनी मोठ्या प्रमाणात नोटा चलनात आणल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

या नोटा कोणाकोणामार्फत त्यांनी चलनात आणल्या याची माहिती घेतली. या मागे मोठे रॅकेट असण्याचाही संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. 

संशयित प्रवीण उपाध्ये चित्रपट महामंडळाचा सदस्य आहे, तर संशयित विश्‍वनाथ सुहास जोशीची पत्नी टीव्ही सीरियलमध्ये काम करत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्या अनुषंगाने उपाध्ये व जोशी या दोघांचा पथकांद्वारे शोध सुरू आहे. 
-  सुशांत चव्हाण, 

सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com