कऱ्हाडात तोतया पोलिस अधिकाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

सहायक पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून चव्हाण तोतया पोलिस अधिकारी म्हणून फिरत होता. त्याला शिताफीने आज अटक झाली.

कऱ्हाड - पोलिसांचा पोशाख परिधान करून लोकांना लुबाडणाऱ्या तोतया पोलिस अधिकाऱ्यास शहर पोलिसांनी आज अटक केली. निलेश सुरेश चव्हाण (वय 26, रा. वडागाव हवेली) असे संबंधिताचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून चव्हाण तोतया पोलिस अधिकारी म्हणून फिरत होता. त्याला शिताफीने आज अटक झाली. त्याच्याकडून सातारा शहरासह कऱ्हाड, सांगली, भागातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यात पोलिसांनी वर्तवली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, निलेश चव्हाण आज दुपारी येथील कोल्हापूर नाका परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यानजीक उभा होता. त्यावेळी पोलिस ड्रेस परिधान केलेला चव्हाण काही लोकांना पोलिस अधिकारी असल्याची बतावणी सांगतही होता. त्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंत गायकवाड यांना समजली. त्यांनी तानाजी शिंदे व प्रफुल्ल गाडे यांना कर्मचाऱ्यांना त्वरित कोल्हापूर नाका परिसरात पाठवले. यावेळी शिंदे व गाडे यांनी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता तो गडबडला. त्यानंतर त्वरित त्याला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत सुरू होती. संशयित तोतया पोलिस चव्हाण सातारा व सांगली जिल्ह्याच्या विविध भागात पोलिस अधिकारी म्हणून फिरत होता, अशी माहिती तपासात समोर येत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fake police officer arrested in Karhad