फलटण बस स्थानकातून ९०० स्मार्ट कार्ड वितरित

फलटण - स्मार्ट कार्ड घेण्यासाठी बस स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांनी केलेली गर्दी.
फलटण - स्मार्ट कार्ड घेण्यासाठी बस स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांनी केलेली गर्दी.

फलटण - राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडे सवलतीसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून, ५५ रुपये भरून स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी येथील बस स्थानकात ज्येष्ठ नागरिक गर्दी करत आहेत. एसटी प्रशासनाने त्यांच्यासाठी किमान सावली आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत ९०० स्मार्ट कार्ड वितरित झाली आहेत.

बस स्थानक कार्यालयात एक संगणक आणि तदनुषंगिक यंत्रणा उभारली असून, दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत या ठिकाणी ज्येष्ठ स्त्री व पुरुष दररोज गर्दी करीत आहेत. बस स्थानकावरील स्मार्ट कार्ड वितरण केंद्राशिवाय शहरात दोन ठिकाणी खासगी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तेथे जवळपास दुप्पट म्हणजे १०० रुपये प्रत्येकी घेतले जात असल्याने या खासगी केंद्रांवर गर्दी कमी दिसत आहे.

ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे पत्रकार, डॉ. आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त व्यक्ती, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनाही स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. त्यामुळे या सर्वांची स्मार्ट कार्ड घेण्यासाठी बस स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड घेण्यासाठी दररोज मोठी गर्दी करीत असले तरी एसटी प्रशासनाने बस स्थानक आवारात ज्येष्ठांना रांगेने स्मार्ट कार्ड घेण्याची व्यवस्था केली असल्याने ही सर्व वडीलधारी मंडळी उन्हाची पर्वा न करता, अन्नपाण्याची वाट न पाहता दिवसभर उन्हात थांबून स्मार्ट कार्डसाठी गर्दी करीत आहेत. एसटी प्रशासनाने त्यांच्यासाठी किमान सावली आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे.

राज्य परिवहन महामंडळ ज्येष्ठ नागरिकांना आतापर्यंत प्रवास भाड्यात अमर्याद किलोमीटर प्रवास सवलत देत असे. मात्र, आता स्मार्ट कार्डद्वारे वर्षाला केवळ चार हजार किलोमीटर अंतरासाठी ही प्रवास भाडे सवलत मिळणार आहे. कोणीतरी हा ४००० किलोमीटर प्रवास मोफत करता येण्याची आवई उठविली असल्यामुळे प्रत्येकी चार हजार किलोमीटर मोफत प्रवासासाठी मिळणार असल्याच्या आनंदाने स्मार्ट कार्ड खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले. 

आतापर्यंत आधार कार्ड, तहसील कार्यालयाने दिलेले वयाचा दाखला असे स्वरूप असलेले कार्ड, अन्य मार्गाने सदर व्यक्तीचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे दर्शविणारी ओळखपत्रे स्वीकारली जात असत. मात्र, त्यातून काही गैरप्रकार समोर आल्याने एसटी प्रशासनाने स्मार्ट कार्ड संकल्पना आणली आहे. स्मार्ट कार्डशिवाय प्रवास भाडे सवलत मिळणार नसल्याने संबंधितांना सवलतीसाठी हे कार्ड अनिवार्य असल्याने सहाजिकच त्यासाठी गर्दी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com