मुलाची महावितरण कार्यालयातच दशक्रिया

अमित आवारी
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

नगर: महावितरणच्या हलगर्जीमुळेच संदेश अनिल आढाव या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे कुटूंबिय व प्रहार संघटनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयातच आज दशक्रिया विधी केला. 

नगर: महावितरणच्या हलगर्जीमुळेच संदेश अनिल आढाव या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे कुटूंबिय व प्रहार संघटनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयातच आज दशक्रिया विधी केला. 

या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच कुटूंबियांनी मुंडण केले. पिंडही पाडले. तसेच प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय बारस्कर महाराज यांनी दशक्रियेचे प्रवचनही दिले. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम सोडून तेथे आले होते. 
संदेशचे वडील अनिल दौलत आढाव यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू संस्कृती प्रमाणे दशक्रिया विधीचा कार्यक्रम महावितरणच्या नगर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये केला. सारोळा सोमवंशी (ता.श्रीगोंदे) येथील मी रहिवासी आहे. माझा मुलगा संदेश अनिल आढाव (वय 17) याचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्यास पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार आहे. 

तीन नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गवत आणण्यासाठी माझी पत्नी, मुलगी व संदेश शेतामध्ये गेले होते. संध्याकाळी सहाच्या दरम्यान घरी गवत घेऊन येत असतांना माझ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. मी शेताकडे पळत गेलो असता माझा मुलगा विद्युत तारेमध्ये गुंतलेल्या अवस्थेत होता. गवत गोळा करुन झाल्यावर घराकडे येत असतांना शेताजवळील बांधावरुन पाय घसरुन तो खाली तारेवर पडला आणि त्याला ओढण्यासाठी गेलेली माझी मुलगी प्रतीक्षा आढाव हे दोघेही तारेला चिकटले. त्यांना वाचवण्यासाठी माझी पत्नी रोहिणी आढाव हिने प्रतीक्षाचे पाय धरुन ओढण्याचा प्रयत्न केला असता तिच्या हाताला मुंग्या आल्या. त्या दूर फेकल्या गेल्या. त्यानंतर पत्नीने अंगावरची साडी काढून हाताला गुंडाळली व मुलीला दूर ओढले. प्रयत्न केल्यानंतर मुलीला दूर ओढले. ती बेशुध्द अवस्थेत होती. मुलाला पण तारेपासून दूर काढले. परंतु तो जागेवरच मृत झाला होता. तिघांनाही (पत्नी,मुलगा व मुलगी) उपचारासाठी सुपे येथील निरामय 
हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे नेल्यानंतर डॉक्‍टरांनी मुलाला मृत घोषित केले. पत्नी व मुलीवर उपचार केले. 

माझ्या शेतामध्ये महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी व एक सिमेंटचा खांब आहे. हा खांब तीन आठवड्यापासून माझ्या शेतामध्ये पडलेला आहे. त्या खांबावरील दोन्ही बाजूच्या तारा माझ्या शेतात जमिनीवर पडलेल्या आहेत. या बाबतची माहिती वेळोवेळी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांना दिलेली होती. तरीही विद्युत प्रवाह महावितरणाने खंडित केला नव्हता. त्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. 

आज सकाळी साडेनऊ वाजता महावितरण कार्यालयात आढाव कुटूंबिय व प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय बारस्कर महाराज, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हाकार्याध्यक्ष अजित धस, प्रकाश बेरड, विजय भंडारे, कृष्णा खामकर, वामन भदे,माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.

पिंडाला शिवला दर्भाचा कावळा 

या वेळी बारस्कर महाराज यांनी प्रवचन केले. प्रवचना दरम्यान पोलिसांचे पथक तेथे आले. ""भारतीय संविधानानुसार धार्मिक विधी बंद करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संदेशच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या महावितरण कार्यालयातच हा दशक्रिया विधी सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही थांबवू नये.'' असे बारस्करांनी स्पष्ट करताच आलेले पोलिस पथकही बाजूला उभे राहिले. अन्‌ महावितरण कार्यालयातच संदेशच्या पिंडाला दर्भाचा कावळा करुन त्याचा स्पर्श त्याला करण्यात आला. दशक्रिया विधीनंतर महावितरण अधिकाऱ्यांनी संदेशचे कुटूंबिय व प्रहार संघटनेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Performed Child Dashkriya Vidhi at Maharashtra State Electricity Board MSEB Office