शेतकऱ्यांनो, आता तुम्हीसुद्धा व्हा ऑनलाइन...

रवींद्र माने
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सरकारचा नवा कार्यक्रम - पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६१३ पॉस मशीनद्वारे खतांचे वितरण

तासगाव - या १ जून २०१७ पासून शेतकऱ्यांना रासायनिक खतांची ऑनलाइन खरेदी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि आधार कार्ड असेल तरच रासायनिक खते मिळणार आहे. यावर्षी खतांचे अनुदान कंपन्यांना तर पुढील वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६१३ पॉस मशीनद्वारे खतांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. 

सरकारचा नवा कार्यक्रम - पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६१३ पॉस मशीनद्वारे खतांचे वितरण

तासगाव - या १ जून २०१७ पासून शेतकऱ्यांना रासायनिक खतांची ऑनलाइन खरेदी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि आधार कार्ड असेल तरच रासायनिक खते मिळणार आहे. यावर्षी खतांचे अनुदान कंपन्यांना तर पुढील वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६१३ पॉस मशीनद्वारे खतांचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांना अनुदानावर दिली जाणारी खते मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वापरासाठी असल्याने यावर्षीपासून शेतकऱ्यांना पॉस मशीनद्वारे खते विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील अनुदानित खत विक्रेत्यांना पॉस मशीनवरून खत विक्री बंधनकारक करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ६१३ पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यावर शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि अंगठ्याचा ठसा घेऊन शेतक-यांना खते विक्री करावी लागणार आहेत. हे पॉस मशीन एका खत कंपनीकडून वितरित करण्यात येणार आहे. लिंकवेल कंपनीची ही पॉस मशीन असणार आहेत. होलसेल विक्रेत्यांकडून घेतलेल्या खतांची माहिती त्यात आहे. विक्री केलेल्या खतांचा साठा याची माहिती ऑनलाइन कृषी विभागाला उपलब्ध असणार आहे. 

योजनेच्या पहिल्या वर्षी शेतक-यांच्या खतांवर शासनाकडून दिले जाणारे अनुदान संबंधित कंपन्यांच्या नावावर तर पुढील वर्षापासून त्या त्या शेतकऱ्याच्या नावावर बॅंकेत जमा करण्यात येणार आहे. एक जूनपासून योजना सुरू होणार असली तरी कोणतेही प्रशिक्षण अथवा पूर्ण माहिती अद्याप खते विक्रेते अथवा शेतक-यांपर्यंत पोहोचलेले नाही. प्रशासकीय पातळीवर मात्र एक प्रशिक्षण पूर्ण झाले. तालुका पातळीवर याची माहिती व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

१४६६ परवानाधारक विक्रेते
जिल्ह्यात १४६६ परवानाधारक खत विक्रेते आहेत. पहिल्या टप्प्यात अनुदानित रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या ६१३ विक्रेत्यांकडून पॉसद्वारे विक्री करण्यात येणार आहे. उर्वरितांना वर्षभरात टप्प्याटप्प्याने पॉस मशीन पुरवली जाणार आहे.

१ लाख २५ हजार टन खताची गरज
गतवर्षी १ लाख ३९ हजार टन रासायनिक खतांची मागणी होती. त्यापूर्वीचा ३० हजार टन खते शिल्लक होती. ३१ मार्च २०१७ नंतर ४९ हजार टन रासायनिक खते शिल्लक आहेत. त्याचा अर्थ जिल्ह्यात सरासरी १ लाख २५ हजार टन रासायनिक खते लागतात.

शेतकरी आणि विक्रेत्यांना थोडा त्रास होणार असला तरी या निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने केली जाणारी खतांची विक्री थांबणार आहे.
- बाबूराव जाधव, अध्यक्ष, सांगली जिल्हा शेती औषधे, खते, कीटकनाशके विक्रेता संघटना

पॉसद्वारे अनुदानित रासायनिक खत विक्रीच्या निर्णयामुळे बेकायदा विक्रीवर बंधने येणार आहेत. शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आवश्‍यक आहे. पहिल्या टप्प्यात ६१३ रिटेल विक्रेत्यांना पॉस मशीन देण्यात येणार आहे.
- धनाजी पाटील, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग

Web Title: farmer come on online