कांदा पीक उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगावतळ येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील सावरगावतळ येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दशरथ सुभान वाघमारे (वय-60) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा मृतदेह आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी आढळला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दशरथ वाघमारे यांची सावरगाव तळ गावात गट क्रमांक 155 व 156 मध्ये सहा एकर शेती आहे. त्यांचे चार भावांचे एकत्रित कुटुंब असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असे कुटुंब आहे.

दोन वर्षांपासून हा भाग दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने, त्यांनी या क्षेत्रातील तीन एकरावर कांदा पिक केले होते. पिक चांगले आल्याने, पिकासाठी त्यांनी केलेला खते व औषधांसह उत्पादन खर्च तसेच गावातील सेवा सहकारी संस्था व पतसंस्थेचे सुमारे चार लाख रुपये कर्ज फिटण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने या परिसरात कहर केला होता. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अस्मानी संकटाच्या गर्तेत सापडल्याने, गेल्या पाच सहा दिवसांपासून ते मानसिक तणावात होते.

आज सकाळी त्यांनी भाऊबीजेनिमित्त आपल्या कुटुंबासह दिवाळीचा फराळ केला. व ते शेतात कांदापिकाला चक्कर मारण्यासाठी गेले होते. दरम्यान जनावरांच्या चारापाण्यासाठी कुटूंबातील व्यक्ती कामाला लागल्याने घरी कोणी नव्हते. सकाळी नऊच्या सुमारास घरी आलेल्या सुनेने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेतील सासऱ्याला पाहून आरडाओरड करीत इतरांना बोलावले. त्यांनी तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात व तेथून उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रुग्णालयात आणण्यात आला.

याबाबत त्यांचे बंधू एकनाथ वाघमारे यांनी संगमनेर ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Committed Suicide Due to Nervousness