बिबट्याच्या तावडीतून शेतकरी बचावला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

कोकरूड - डोंगर परिसरात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याची शिकार होता-होता थोडक्‍यात बचावला. हिंस्र बिबट्या गुरगुरू लागल्याने शेतकऱ्याने धूम ठोकली आणि जीव वाचविला. या घटनेनंतर या शेतकऱ्याचा थरकाप दिवसभर कमी झाला नव्हता. आमचा जीव गेल्यावर वन विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल शेतकरी व महिलांतून केला जात आहे.

चिंचोली (ता. शिराळा) येथील शेतकरी निवृत्ती बंडू जाधव (वय ६८)  सकाळी साडेसहाला गावच्या पूर्व बाजूस व वारणा डावा कालव्यापुढे डोंगराच्या पायथ्यास बिबीच्या माळरानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यांना २५ फुटांवर बिबट्या व त्याची दोन पिले नजरेस पडली. बिबट्याने जाधव यांना पाहून डरकाळी फोडली. तो आवाज ऐकताच जाधव यांचा थरकाप उडाला आणि जिवाच्या आकांताने त्यांनी घराच्या दिशेने धूम ठोकली. 

रविवारी (ता. १६) चिंचोली व मोरेवाडीच्या हद्दीवर कोकरूड-शेडगेवाडी रस्त्यावर मुंबईहून गणेशोत्सवाला आलेल्या भाविकांना, शेतकरी व ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्याचा चिंचोली-मोरेवाडी शिवार ते डोंगर परिसर असा दिवस-रात्र वावर आहे. परिसरात दाट ऊसशेती व जंगल आहे. यामुळे बिबट्या तीन-चार दिवसांपासून परिसरात थांबला आहे. शेतकऱ्यांना रोज शिवार व डोंगर परिसरात जनावरे घेऊन जावे लागते. चारा आणण्यासाठी फेरी मारावी लागते. त्यामुळे दोन गावांत भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.

Web Title: Farmer escaped from the clutches of leopard