शेतीच्या प्रश्‍नांवर खेळखंडोबा का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सांगली - जिल्ह्यात शेती प्रश्‍नांवर ‘महावितरण’सह शासकीय यंत्रणांचा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्‍शन मिळायला वर्षानुवर्षे लागतात. विजेची उपकरणे बंद पडली तर ती दुरुस्त करून दिली जात नाहीत. कुणी बनावट बियाणे देऊन फसवितो. मात्र, कारवाई होत नाही. भरपाई मिळत नाही, हे असे किती काळ चालवून घ्यायचे, असा सवाल करीत आमदार शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे यांनी आज कृषी आढावा बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. 

सांगली - जिल्ह्यात शेती प्रश्‍नांवर ‘महावितरण’सह शासकीय यंत्रणांचा खेळखंडोबा सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज कनेक्‍शन मिळायला वर्षानुवर्षे लागतात. विजेची उपकरणे बंद पडली तर ती दुरुस्त करून दिली जात नाहीत. कुणी बनावट बियाणे देऊन फसवितो. मात्र, कारवाई होत नाही. भरपाई मिळत नाही, हे असे किती काळ चालवून घ्यायचे, असा सवाल करीत आमदार शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे यांनी आज कृषी आढावा बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, ‘आत्मा’चे सुरेश मगदूम उपस्थित होते. 
सन २०१३ पासून मागणी करूनही अनेक शेतकऱ्यांना वीजजोडणी मिळालेली नाही. इतर जिल्ह्यांत सन २०१६ पर्यंतच्या जोडण्या मिळाल्या, इथल्या शेतकऱ्यांनी आकडा टाकावा का? असा संताप तिन्ही आमदारांनी व्यक्त केला. 

अवेळी वीजपुरवठा खंडित करणे थांबवा, वीज उपकरण नादुरुस्त झाल्यानंतर वेळेत दुरुस्ती द्या, गावठाणातील वीज वाहिन्यांवरून कृषिपंपांना कनेक्‍शन द्या, अशा मागण्या करण्यात आल्या. दोन वर्षांपूर्वी निकृष्ट बियाणे विकलेल्या कंपन्यांवर कारवाई कधी होणार, असा जाब विचारण्यात आला. श्री. देशमुख यांनी या प्रश्‍नांची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना दिल्या.  

कृषी योजनांची जनजागृती, पीकनिहाय खरेदी केंद्र, शेतकऱ्यांची हेतुपुरस्सर अडवणूक, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई अशा सूचना देण्यात आल्या. 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी प्रास्ताविक केले. जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप व कृषी दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. प्रवीण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश मगदूम यांनी आभार मानले.

आटपाडीवर अन्याय का?
आमदार बाबर यांनी पैसेवारीत आटपाडीवर अन्यायाबद्दल शासकीय यंत्रणांवर हल्लाबोल केला. लगतच्या तालुक्‍यांतील पैसेवारी ५० पेक्षा कमी, तेथे दुष्काळाच्या सवलती मिळताहेत; मात्र आटपाडीला का वगळले आहे, असा सवाल केला. शासकीय यंत्रणांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली नाही. आता मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून तेथे सवलती जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. 

शेतकऱ्यांचा गौरव
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार रमेश विलास जाधव (येलूर, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार माधवराव दत्ताजीराव पाटील यांचे वारस मोहन माधवराव पाटील (कांदे, ता. शिराळा) यांना प्रदान करण्यात आला. 

Web Title: farmer issue agriculture book publish