...त्यामुळे शेतकऱ्यांनी कोबी टाकला "जिल्हाधिकारी' आवारात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

सुळग्यात कोबी पिकाच्या शेतात बकरी सोडल्याची घटना ताजी असताना सोमवारी (ता. 2) बेळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यावर कोबी टाकून निदर्शने केली.

बेळगाव - सुळग्यात कोबी पिकाच्या शेतात बकरी सोडल्याची घटना ताजी असताना सोमवारी (ता. 2) बेळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यावर कोबी टाकून निदर्शने केली. कवडीमोल दराने कोबीची खरेदी होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कोबीला हमीभाव द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

हे पण वाचा - उन्हाळा आला... कसे राहाल कूल...? 

बाजारपेठेत कोबीचे दर कोसळले असून प्रती दहा किलोला केवळ 8 ते 10 रुपये दर दिला जात आहे. शेतकरी कोबी पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. कष्टही अधिक घेतले जात असून पाणी, खते, औषध फवारणी करण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबत असतात. पण, कवडीमोल भाव देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात घातले जात आहे. याला शासनाचे धोरण कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, 2006 मध्ये तसेच त्यानंतरही निवेदने देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती; पण शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. भाजीपाल्याला हमीभाव देण्यासह शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषीधोरणातही बदल करावेत, अशी मागणीही करण्यात आली. कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब देसाई, सुभाष दायगौंडा, बाळू मायण्णा, रामंचद्र फडके, रामगौडा पाटील, टोपण्णा बसरीकट्टी, मारुती बुर्ली, नामदेव धुडूम, निंगाप्पा तुरमुरी, राजू कागणीकर आदी उपस्थित होते. 

हे पण वाचा - एक कोटीहून अधिकच्या वसुलीचा तगादा ; राजारामपुरीतील खासगी सावकारावर गुन्हा... 

किलोला केवळ एक रुपये दर 
अतिवृष्टी आणि पुरामुळे गतवर्षी मोठ्या प्रमाणात पीकहानी झाली. त्यामुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु असताना आता कोबीसह भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. व्यापाऱ्यांकडून सध्या केवळ 1 रुपया प्रती किलोने कोबीची खरेदी केली जात आहे. त्यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer protest in belgaum collector office