...तर कृषी महोत्सव उधळून लावू

शांताराम पाटील
शनिवार, 5 जानेवारी 2019

इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज पत्रकार बैठकीत दिला. कृषी महोत्सवात शेतकर्‍यांच्या विषयी कळवळा असल्याचा खोटा आव आणणार्‍या शासनाने शेतकर्‍यांचे आगोदर ठरलेले अनुदान द्यावे, मगच कृषी महोत्सवासारखी नौटंकी करावी असा आरोप ही संबंधीत शेतकर्‍यांनी केला.

ते म्हणाले, तालुका कृषी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत, मंत्रालयापासून मंत्र्यांच्या घरापर्यंत तालुक्यातील शेतकर्‍यांनी हेलपाटे घालून अनुदानासाठी संबंधीतांचे उंबरठे झिजवले. मात्र अडचणीत आलेल्या हरीतगृह शेतकर्‍यांचा शासनाला कळवळा आला नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यात या प्रकारचे अनुदान देण्यात आले आहे. मात्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या तालुक्यातील शेतकर्‍यांना जाणून बुजून कृषी अधिकार्‍यांच्या चुकीमूळे अनुदानापासून वंचीत ठेवले जात आहे. गेल्या वर्ष भरात अनुदान मिळावे म्हणून तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारत जेवढी निवेदने दिली त्याची रद्दी विकली तरी शासनाला एक लाख रुपये मिळाले असतील. मात्र या कडे कोणालाही बघायला सवड नाही. सद्याचे शासन शेतकर्‍यांच्या विषयी खोटा कळवळा दाखवत आहे. जिल्हा कृषी महोत्सव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भरवून लोकांना तांत्रिक व अधुनिक शेतीकडे वळण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा दिखावा करत आहे. मात्र जे शेतकरी तांत्रिक शेतीकडे वळले त्यांचे अनुदान देत नाहीत. हा सरळ-सरळ खोटारडेपणा आहे. शासनाला जर खरच शेतकर्‍यांचा कळवळा असेल तर त्यांनी तात्काळ आमचे थकलेले अनुदान खात्यावर वर्ग करावेत अन्यथा सोमवार 7 जानेवारीपासून आम्ही इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसू तसेच 9 जानेवारीला इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावू. एकीकडे शेतकर्‍यांचे अनुदान थकवायचे व दुसरीकडे वाळवा तालुक्यात शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करायचा हे आम्ही चालू देणार नाही. आता आरपारची लढाई लढू. आम्हाला जर अनुदान मिळाले नाही. तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. 

पत्रकार बैठकीस राजन महाडिक, प्रदीप पाटील, नंदकुमार चव्हाण, महादेव पाटील, पोपट पाटील, अमित माने, किरण माने, जयसिंग मोरे, विकास साळुंखे, रामराव पाटील, सतीश पाटील उपस्थित होते.

Web Title: farmers are going to agitate