तुम्हाला इर्जिक काय असते माहितीय... भलरी ऐकायचीय, बघा मग ही ज्वारीची काढणी

संजय आ. काटे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

.पूर्वी अशी इर्जिक खूप असत. आता त्या उरल्या नाहीत.  ही इर्जिक साग्रसंगीत असते.

श्रीगोंदेः  गावाकडे हल्ली कष्टाच्या कामाला मजूर मिळत नाही. घरात भली मोठी शेती असेल आणि मजूर नसतील तर सावड केली जाते. आपण दुसऱ्याच्या शेतात जायचं मग त्याने आपल्याकडे यायचं, याला सावड म्हणतात. काही ठिकाणी शेतकरी इर्जिक घालतात. म्हणजे त्याने मटणाचा बेत ठेवायचा सकाळ-संध्याकाळ. काहीजण गोडधोड करतात.

पूर्वी अशी इर्जिक खूप असत. आता त्या उरल्या नाहीत.  ही इर्जिक साग्रसंगीत असते.

मंत्रालयात असणारे चांभुर्डी ता. श्रीगोंदे येथील शेतकरी निवास नाईक यांनी चार एकर ज्वारीची काढणीसाठी चांभुर्डीसह कोरेगव्हाण व सारोळा सोमवंशी या गावातील सत्तरपेक्षा जास्त शेतकरी इर्जीक करण्यासाठी एकत्र आले होते. पाच ते सहा तासात ही ज्वारी या एकीच्या जीवावर काढली. 
ज्वारीची काढणी म्हटली की भल्लारी आलीच आणि मग 'भल्लरी ...दादा...भल्लरी...' म्हणताना डफडयावर थाप आणि गायन हेही आलेच.

अगं मैना तुझी हौस पुरवीन... या गाण्यापासून लोकगीते आणि देवीचे गाणे म्हणत त्यावर नाचत शेतकऱ्यांनी ही ज्वारीची काढणी केली. 
या शेतकऱ्यांच्या श्रमपरिहारासाठी लापशी, भात, आमटी आणि भाकरी असा भन्नाट बेत होता. 
नाईक म्हणाले, शेतकऱ्यांची एकी आणि कष्टाची परिसीमा या इर्जीक च्या माध्यमातून अनुभवली. ती मजा काही वेगळीच असते मात्र शेतकऱ्यांच्या कष्ट आणि त्यांची हिम्मत यातून कळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers gathered to harvest sorghum