कवितेतून मांडले शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याचे दुःख ः भालेराव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

आपले आई, बाप शेतकरी असल्याची लाज बाळगू नका असे सांगताना, ग्रामीण भागातील मुलांनी कठीण परिस्थितीवर मात करावी. आलेल्या संकटातून पुढे जाण्याची जिद्द बाळगण्याचे आवाहन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.

संगमनेर - आपले आई, बाप शेतकरी असल्याची लाज बाळगू नका असे सांगताना, ग्रामीण भागातील मुलांनी कठीण परिस्थितीवर मात करावी. आलेल्या संकटातून पुढे जाण्याची जिद्द बाळगण्याचे आवाहन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले. 

कवी अनंत फंदी व्याख्यानमालेतील सहावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गा तांबे होत्या. "मी आणि माझी कविता' या विषयावर बोलताना त्यांनी त्यांच्या जन्मापासून असलेल्या मातीच्या नात्याची मांडणी केली. 

काळ्या आईशी, शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा, त्यांचे कष्ट, त्यांचे जगणे, वेदना, व्यथा व प्रत्यक्षात घेतलेल्या अनुभवाचा कवितेच्या निर्मितीतील प्रवास सांगताना त्यांनी श्रोत्यांना भावविभोर केले. मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील अत्यंत लहान खेड्यात जन्मापासून सुरू झालेला जीवनप्रवास उलगडताना त्यांनी शालेय आयुष्यावर भाष्य केले. त्यात चौथीला फुकटपास, सातवीला ढकलपास, तर मॅट्रिकला नापास झालो असलो, तरी पाचवी ते दहावीच्या काळात संपूर्ण भगवद्‌गीता, चक्रधरांचे 1050 सूत्र, बहिणाबाईंच्या कविता, जात्यावरच्या ओव्या अशी मोठी वाङ्‌मय तोंडपाठ असल्याचे सांगितले. 

मी नाही तर शिक्षण व्यवस्था नापास झाली होती. प्रा. राम शेवळकरांमुळे पाचवीच्या अभ्यासक्रमात चक्क 21 वर्षे राहिलेली "बाप' ही कविता सात कोटींपेक्षा अधिक मुलांनी अभ्यासली. 

सासरी नांदणारी लेक व आईतील प्रश्नोत्तराच्या स्वरूपातील उभ्या आडरातर येवून जाय गं लेकी ही कविता, तसेच त्यांच्या जन्माची कहाणी सांगणारी मराठवाडी बोली भाषेतील मव्हा जन्म कव्हा झाला या कवितेने वातावरण कातर केले. 

"धोपट मार्गा जाऊ नको' सांगण्याची वेळ - अमृत बंग 

""बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको... हा कवी अनंत फंदी यांचा फटका समाजातील परिवर्तनामुळे आजच्या युवकांच्या बाबतीत कुचकामी ठरला असून, त्यांच्यासाठी "बिकट वाट वहिवाट असावी, धोपट मार्गा जाऊ नको.. "अर्था'मागे जा तू आपुला, निव्वळ आर्थिक बनू नको' असे सांगण्याची वेळ आली आहे,'' असे मत युवकांच्या निर्माण संस्थेचे समन्वयक अमृत बंग यांनी व्यक्त केले. 

कवी अनंत फंदी व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजय रणभोर होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय व राणी बंग या दांपत्याचे वलय व वारसा चालवताना युवकांसाठी "निर्माण' या संस्थेच्या माध्यमातून विविध संधी मिळवून देणाऱ्या अमृत बंग यांच्या सडेतोड व तात्त्विक व्याख्यानाने श्रोत्यांच्या मनावर जादू केली. 

"युवकांच्या अर्थपूर्ण जीवनाचा शोध' या विषयावर बोलताना त्यांनी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सरसावलेल्या युवक व पालकांची भूमिका यावर भाष्य केले. 

शाळा, महाविद्यालयात शिकताना जीवनात जगण्याचा हेतू सांगितला जात नाही किंवा मदतही केली जात नाही, तर ज्याची चलती आहे ती पूर्व दिशा ग्राह्य धरून त्याप्रमाणे विद्यार्थी मार्गक्रमण करताना दिसतात. 18 ते 28 या वयोगटातील युवकांची संख्या जगात व लोकसंख्येच्या तुलनेत भारतातही जास्त असून, या भवितव्याचे सर्व व्यवस्थित चालू आहे का हे बघण्याचा प्रयत्न "निर्माण'च्या माध्यमातून करण्यात आला.

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी युवकांच्या भूमिकेचा शोध घेताना आजच्या युवा पिढीबाबत आत्महत्या, अपघात, व्यसनाधीनता, असुरक्षित लैंगिक संबंध, बेरोजगारी हे विषय सोडून या पिढीची सुदृढ होण्यासाठी काही ठोस कार्यक्रम होत नाही. यांच्या यशाची मानके समजली जाणाऱ्या घर, गाडी, नोकरीऐवजी त्याच्यात कौशल्य व आत्मविश्वास, धैर्य किती आहे, त्यांचे वैयक्तिक व सामाजिक नातेसंबंध कसे आहेत, या बाबींचा शोध घेणे महत्त्वाचे असूनही आपल्याकडे याचा दुर्दैवाने अभ्यास झालेला नाही, याची खंत बंग यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' Lives and Dying Illustrated by Poetry: Indrajit Bhalerao