"जायकवाडी'च्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

"जायकवाडी'चे पाणी धरणासाठी संपादित नसलेल्या क्षेत्रात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेवगाव : "जायकवाडी'चे पाणी धरणासाठी संपादित नसलेल्या क्षेत्रात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केली. 

जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांसह या मागणीचे निवेदन घुले यांनी तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना आज दिले. 

घुले म्हणाले, ""राज्याचे हित लक्षात घेऊन फक्त सातशे रुपये एकर दराने तालुक्‍यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सुपीक शेतजमिनी जायकवाडी धरणासाठी दिल्या. त्या बदल्यात त्यांना मुळा धरणाच्या बारमाही पाटपाण्यासह अनेक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक वर्षे उलटले तरी अजूनही धरणग्रस्तांच्या समस्या संपलेल्या नाहीत. अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणात आलेले अतिरिक्त पाणी तालुक्‍यातील दहिगावने, घेवरी, चांदगाव, शहरटाकळी, भावीनिमगाव, ढोरसडे, अंत्रे, हिंगणगाव, दहिफळ, दादेगाव, ताजनापूर, एरंडगाव, खानापूर आणि कऱ्हे टाकळी या शिवारातील धरणग्रस्तांच्या संपादित नसलेल्या क्षेत्रात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात असलेल्या बाजरी, ऊस, कपाशी, तूर या पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. 

पाणीपातळी कमी होत नसल्याने या पिकांबरोबर पुढील रब्बी हंगामही वाया जाणार आहे.'' 
संजय कोळगे, अरुण लांडे, पंडित भोसले, कृष्णा पायघन, के. वाय. नजन, प्रा. संतोष अडकित्ते, श्‍याम जाधव, उमेश वैद्य, दादा माळवदे, बन्सी पवार, संपत मिसाळ, सचिन माळवदे, रामभाऊ राऊत, संजय पाऊलबुद्धे, श्रीधर कर्डिले, प्रदीप मडके आदी उपस्थित होते. 

पंचनामे तत्काळ करू

नुकसानग्रस्त शेतजमिनींची छायाचित्रे दाखवत, कोणत्या गावातील कोणत्या गट क्रमांकाखालील शेती पाण्याखाली गेली, याची वस्तुनिष्ठ माहिती माजी आमदार नरेंद्र घुले यांनी तहसीलदार डॉ. भामरे यांना दिली आणि नुकसानीचे चित्र मांडले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, या "बॅक वॉटर' भागातील पूरग्रस्त परिस्थितीचे पंचनामे तत्काळ करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू. 
- डॉ. विनोद भामरे, तहसीलदार, शेवगाव  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' loss with 'Jaikwadi' water