सौरऊर्जेच्या वापराने हरितक्रांतीकडे शेतकऱ्यांचे पाऊल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

माळशिरस - माळशिरस परिसरात सौरऊर्जा प्रकल्पापासून तयार होणारी वीज वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तालुक्‍यातील घुलेनगर (पानीव) येथील एम. डी. सिद या शेतकऱ्याने सौरऊर्जेचा वापर करून शेतीच्या उत्पन्नात वाढ केली आहे. 

माळशिरस - माळशिरस परिसरात सौरऊर्जा प्रकल्पापासून तयार होणारी वीज वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तालुक्‍यातील घुलेनगर (पानीव) येथील एम. डी. सिद या शेतकऱ्याने सौरऊर्जेचा वापर करून शेतीच्या उत्पन्नात वाढ केली आहे. 

एम. डी. सिद हे सहा महिन्यांपूर्वी वीज वितरण कंपनीची वीज शेतीसाठी वापरत होते; परंतु वीज मिळण्यात अनियमितता होती. ट्रान्सफॉर्मर नेहमीच बिघडत असे. मीटरप्रमाणे वीज बिलाची आकारणी केली जात नसे व वीज कमी दाबाने मिळे. दरम्यान, पिकांना वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके डोळ्यासमोर वाळत असल्याचे त्यांना पाहावे लागे. या सर्व प्रकाराला कंटाळून सिद यांनी सौरऊर्जेचा वापर शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना बारामती आणि गोरडवाडी (ता. माळशिरस) येथील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्याची मानसिकता तयार झाली. 

सुरवातीला एकरकमी खर्च करावा लागतो. तीन एचपीची मोटरसाठी एक लाख 80 हजार रुपये या प्रकल्पासाठी गुंतवावे लागतात. सकाळी आठ वाजता सौरऊर्जेवर सुरू केलेली तीन एचपीची मोटर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखंड चालू असते. सारटेक कंपनीचे मार्गदर्शक प्रकाश गुलाबराव माने म्हणाले, सौरऊर्जेचा प्रकल्प सुरू करण्यासाठी कमीत कमी एक लाख 80 हजार रुपये खर्च येतो. कंपनीकडून या प्रकल्पासाठी 25 वर्षांची गॅरंटी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सौरऊर्जा प्रकल्प काटकसरीचा, फायद्याचा आहे. माळशिरस परिसरातील शेतकऱ्यांचा सौरऊर्जा प्रकल्पाकडे कल वाढत आहे. 

सौरऊर्जेवर ठिबक करून अडीच एकर गहू केला. साडेतीन महिन्यांत 37 क्विंटल गहू तयार झाला. त्यापासून मला 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच याच प्रकल्पावर दोन एकर ऊस केला आहे. उसाला ठिबक पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. एका वर्षात 160 टन ऊस तयार होईल, असा अंदाज आहे. उसापासून तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल. 
- एम. डी. सिद, शेतकरी 

Web Title: Farmers step towards Green Revolution by using solar energy