'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

गावात दोन महिन्यांपासून संपाची तयारी केली जात होती. त्यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. 'कोअर कमिटी'ने मात्र संप मागे घेऊन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

पुणतांबे : 'शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही; तो सुरूच आहे. ठरल्याप्रमाणे सोमवारी (ता. पाच) 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन कायम आहे. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील,' असे शेतकऱ्यांनी आज (शनिवार) जाहीर केले. 

संप मागे घेण्याची घोषणा करणाऱ्या किसान क्रांतीच्या 'कोअर कमिटी'चा शेतकऱ्यांनी निषेध केला. गावात दोन महिन्यांपासून संपाची तयारी केली जात होती. त्यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. 'कोअर कमिटी'ने मात्र संप मागे घेऊन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रामुख्याने जयाजी सूर्यवंशी व अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साटेलोटे करून संप मिटविल्याचा आरोप जमलेले शेतकरी करीत होते. 

धनंजय जाधव, सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी त्यांना दिवसभर दूरध्वनी करीत होते. त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे 'कोअर कमिटी'चे सदस्य भूमिगत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, विजय धनवटे, अनिल नळे, बाळासाहेब भोरकडे आदींनी 'कोअर कमिटी'वर विविध आरोप केले. 

राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पटारे यांनी येथे येऊन संपाला शिवसेनेचा पाठिंबा कायम असेल, संप असाच सुरू राहील, अशी भूमिका मांडली. धनंजय जाधव यांचे बंधू माजी सरपंच सर्जेराव जाधव 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, की सात-बारा कोरा झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. आपण संपात सहभागी आहोत.

Web Title: farmers strike pune news marathi news marathi breaking news Devendra Fadnavis