श्रीगोंद्यातील चारही कारखाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांचे हाल

संजय आ. काटे
बुधवार, 15 जानेवारी 2020

तालुक्‍यात यंदाच्या हंगामासाठी दोन लाखांपेक्षा जास्त ऊस शेतात होता. गुऱ्हाळे आणि चारा छावण्या यांना मोठ्या प्रमाणात ऊस तोडला गेला हे वास्तव असले, तरी दिवाळीत पडलेल्या सलग पावसामुळे शेतात उभ्या असणाऱ्या व कमी वाढ झालेल्या उसाच्या पिकाने कात टाकली

श्रीगोंदे : जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा तालुका अशी शेखी मिरविणाऱ्या श्रीगोंद्यातील चारही कारखाने यंदा बंद राहिले. तालुक्‍याचे राजकारण हाकणाऱ्या तीन नेत्यांच्या अखत्यारीतील हे कारखाने बंद राहिल्याने तालुक्‍यातील ऊसउत्पादकांना बाहेरील कारखान्यांच्या नियोजनावर अवलंबून राहावे लागले.
अधिक वाचा- 

aschim-maharashtra/rotary-club-want-create-virtual-classroom-schools-252519">शाळांसाठी रोटरी उभारणार "व्हर्चुअल क्‍लासरुम' 

काही गावांतील शेतकऱ्यांचे हाल सुरू असून, स्थानिक नेते कारखानेच बंद असल्याने तोंडावर बोट ठेवून आहेत. 
तीस लाख टनांपर्यंत उसाचे उत्पन्न काढणाऱ्या श्रीगोंद्यात गेल्या काही वर्षांत उसाच्या शेतीला घरघर लागली आहे. दर वर्षीच्या तुलनेत काही वर्षांत पावसाचा लहरीपणा वाढला आहे. पाऊसही कमी होत असतानाच कुकडी व घोड धरणातील पाण्याचे नियोजन न झाल्याचा सर्वाधिक फटका उसाच्या शेतीला बसला. परिणामी नागवडे, कुकडी हे दोन सहकारी व दोन्ही साईकृपा या खासगी कारखान्यांनी हंगाम बंद ठेवला.

बाहेरच्या कारखान्यांकडून दुर्लक्ष

तालुक्‍यात यंदाच्या हंगामासाठी दोन लाखांपेक्षा जास्त ऊस शेतात होता. गुऱ्हाळे आणि चारा छावण्या यांना मोठ्या प्रमाणात ऊस तोडला गेला हे वास्तव असले, तरी दिवाळीत पडलेल्या सलग पावसामुळे शेतात उभ्या असणाऱ्या व कमी वाढ झालेल्या उसाच्या पिकाने कात टाकली. त्यामुळे उत्पादन वाढले. मात्र, स्थानिक कारखानेच बंद राहिल्याने ज्यांच्याकडे ऊस आहे त्यांची पंचाईत झाली. येथील कारखाने ज्या वेळी सुरू असतात, त्या वेळी बाहेरील कारखाने येथील शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य देतात. यंदा मात्र येथील ऊस कुठेही जाणार नाही, याची शाश्‍वती असल्याने बाहेरच्या कारखान्यांनी त्यांच्याप्रमाणे नियोजन केले. 

उघडून तर बघा- शनिशिंगणापुरात लटकू बंदचा निर्णय फत्ते

सभासदांच्या रोषाचा सामना

तालुक्‍यात सध्या अंबालिका, दौंड ऍग्रो, दौंड शुगर, पारनेर, पराग, व्यंकटेश, घोडगंगा आदी कारखान्यांच्या टोळ्या आहेत. तरीही अनेक ठिकाणी ऊस तोडण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी हताश आहेत. यंदा नागवडे व कुकडी कारखान्यांच्या निवडणुका होत आहेत. हंगाम बंद ठेवून निवडणूक घेण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली आहे. सभासदांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. 

शेतकऱ्यांचा "कार्यक्रम'

चारपैकी कुठलाही एक कारखाना सामोपचाराने सुरू ठेवला असता, तर शेतकऱ्यांचे हाल झाले नसते. मात्र, नेत्यांनी ठरवून शेतकऱ्यांचा "कार्यक्रम' केल्याचे दिसते. 
- अण्णा शेलार, संचालक, नागवडे साखर कारखाना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers were in trouble due to all sugar factories closed