नुकसानग्रस्त शेतकरी कर्जफेडीच्या चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सोसायट्या, जिल्हा बॅंकेला फटका बसणार
जिल्ह्यात पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी संबंधित शेतकरी अधिक आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे त्यांचे हमखास उत्पन्न मिळणार नाही. कर्ज परतफेडीत अडचण येणार असल्याने याचा सर्वाधिक फटका सोसायट्या आणि जिल्हा बॅंकेला बसणार आहे.

सातारा - पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप कृषी विभागाच्या विविध ‘टीम’ गावनिहाय पंचनाम्यात व्यस्त आहेत. शेतीच्या नुकसानीमुळे पुढील वर्षी शेती कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना किमान कर्जमाफी किंवा पीककर्ज पुनर्गठन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे कऱ्हाड, पाटण, सातारा यांसह जावळी, वाई, महाबळेश्‍वर तालुक्‍यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक पुराचा फटका कऱ्हाड, पाटण आणि सातारा तालुक्‍यांना बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शेतीचे ३८ हजार २२५ हेक्‍टरवरील नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक खरीप पिकांचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील ऊस पिकाचा समावेश आहे. ऊस पिकाच्या नुकसानीचा साखर कारखान्यांच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्यामुळे यावेळेस जिल्ह्यात मुबलक ऊस असूनही कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी आहे. यामध्ये कऱ्हाड, पाटण तर काही प्रमाणात सातारा तालुक्‍यातील कारखान्यांच्या गाळपावर परिणाम होणार आहे. 

यासोबतच खरीप हंगामातील पिकेही हातची गेली आहेत. त्यामुळे या पिकांचे नुकसान ५० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पुढील वर्षी हमखास पडणारे उत्पन्न पडणार नाही. त्यामुळे यावर्षी घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे, हा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. शेतीच्या नुकसानीतून मिळणारी मदत ही कर्ज भरण्याइतपत नसणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर व्याजाचा बोजा वाढणार आहे. या कर्जबोजातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतर कर्जमाफी किंवा कजार्च पुनर्गठन यापैकी एक निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे.

आता त्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा शेतकऱ्यांशी संबंधित संघटनांनी याबाबत आवाज उठवून शासनाला तसा निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers worried about debt repayment