FasTag Update : हत्तरगी टोलनाक्‍यांवर फास्टॅग नसेल, तर दुप्पट टोल 

अनिल पाटील 
Tuesday, 16 February 2021

फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी केली जाणार आहे. त्याची तयारी कोगनोळीसह हत्तरगी टोलनाक्‍यावर केली आहे. 

 

कोगनोळी (बेळगाव) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने महामार्गावर धावणाऱ्या वाहनांना सोमवारी (ता. 15) मध्यरात्रीपासून फास्टॅग बंधनकारक केले आहे. फास्टॅग वापराच्या मनाईस मुदतवाढ दिली जाणार नसल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. 14) नागपुरात केली आहे. त्यामुळे फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी केली जाणार आहे. त्याची तयारी कोगनोळीसह हत्तरगी टोलनाक्‍यावर केली आहे. 

शासनाने सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी सोमवारी (ता. 15) मध्यरात्रीपासून होणार आहे. याबाबत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वाहनधारकांनी फास्टॅग वापर केला नसेल तर दुप्पट टोल भरावा लागेल, अशी माहिती कोगनोळी टोलनाक्‍याचे व्यवस्थापक नानासाहेब गायकवाड यांनी दिली. 

हेही वाचा- सेल्फीने लुटला आनंद;  स्टेटसवर  झळकले डीपीसह फोटो

गायकवाड म्हणाले, "कोगनोळी टोलनाक्‍यावर सर्व बूथ फास्टॅग होणार आहेत. ज्या वाहनधारकांकडे फास्टॅग नसेल अशा वाहनधारकांना मध्यरात्रीपासून दुप्पट टोल द्यावा लागेल.' 
फास्टॅग रक्कम शिल्लक नाही, अशा वाहनधारकांनाही दुप्पट टोल द्यावा लागेल. वाहनधारकांनी टोलवर येण्यापूर्वीच फास्टॅगवर रक्कम शिल्लक असल्याची खात्री करावी. दोन महिन्यांपासून टोलनाक्‍यावर ध्वनिक्षेपकाद्वारे फास्टॅग करून घेण्याबाबत माहिती वाहनधारकांना देण्यात येत आहे. त्याचबरोबर माहिती पत्रकेही वाटली आहेत. वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यवस्थापक नानासाहेब गायकवाड, सहाय्यक व्यवस्थापक उत्तम पाटील, सदाशिव लकडे यांनी केले आहे. 

हेही वाचा- Fastag Update : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा; वाहन चालकांचा राडा

24 तासांत 13 हजार वाहने 
कोगनोळी टोलनाक्‍यावरून 24 तासांत सुमारे 13 हजार वाहने ये-जा करतात. मासिक पासची एक हजार वाहने आहेत. फास्टॅगमध्ये रिटर्न सुविधा आहे. 70 टक्के वाहनधारकांकडे फास्टॅग आहे. यातील 10 ते 15 टक्के वाहनधारक खात्यावर रक्कम शिल्लक ठेवत नाहीत. 

सोमवारी रात्रीपासून फास्टॅग अनिवार्य आहे. ज्या वाहनधारकांनी फास्टॅग करून घेतले नसेल, त्यांनी त्वरित करून घेऊन गैरसोय टाळावी. 
- नानासाहेब गायकवाड, व्यवस्थापक, कोगनोळी टोलनाका 
 
वाहनांचा टोल असा : 
वाहन*टोल*फास्टॅग नसल्यास 
कार*75*150 
टेंपो व अन्य वाहने*115*230 
बस, ट्रकसह सहाचाकी*245*490 
थ्री एक्‍सल-दहाचाकी*270*540 
एचसीएम-दहा चाकीपेक्षा अधिक*385*770 
सेव्हन एक्‍सल-चौदा चाकीपेक्षा अधिक*470*940  

 
संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fastag on Hattargi toll plaza double toll vehicle marathi news