एका बापाची धडपड... पोटच्या तिळ्यांना वाचवण्यासाठी! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

कोल्हापूर (कळंबा) येथे वास्तव्य असणाऱ्या सागाव (ता. शिराळा) येथील एका सामान्य कुटुंबातील मातेने तिळ्यांना जन्म दिला. पण ही बाळे कमी वजनाची आणि अपूर्ण दिवसांची असल्याने त्यांना वाचवण्याची धडपड सुरू आहे.

कामेरी : कोल्हापूर (कळंबा) येथे वास्तव्य असणाऱ्या सागाव (ता. शिराळा, जि. सांगली) येथील एका सामान्य कुटुंबातील मातेने तिळ्यांना जन्म दिला. पण ही बाळे कमी वजनाची आणि अपूर्ण दिवसांची असल्याने त्यांना वाचवण्याची धडपड सुरू आहे. आधीच कोरोनाच्या संकटात अडकलेल्या माता-पित्यांना आपल्या पोटच्या गोळ्यांचा जीव वाचवण्यासाठी सुमारे आठ लाखांची गरज असून त्यासाठी पिता प्रयत्न करत आहे.

शिराळा तालुक्‍यातील सागावचे अक्षयकुमार पांडुरंग घोलप कोल्हापूरमधील कळंबा परिसरात राहतात. त्यांची पत्नी सानिका या गर्भवती होत्या. मात्र या लॉकडाऊनच्या काळातच 1 एप्रिल रोजी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने स्थानिक खासगी इस्पितळात दाखल केले. दिवस भरण्यापूर्वीच वेदना सुरू झाल्यामुळे व तीन मुले जन्माला येणार याचा अंदाज डॉक्‍टराना आल्याने त्यांनी तज्ज्ञ डॉक्‍टरच उपचारासाठी मिळणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध झाल्याने प्रसूती झाली. मातेने पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही मिनिटाच्या अंतराने दुसरी दोन बाळे जन्माला आली. तिन्ही बाळे कमी वजनाची व कमी वयाची असल्याने त्यांना काचेच्या पेटीत ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना तत्काळ कोल्हापूर येथील नाईस नवजात शिशू केंद्रात दाखल करण्यात आले. या तीन बाळांमध्ये दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलीची प्रकृती गंभीर आहे. 

या बालकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर विविध प्रकारचे उपचार करावे लागणार आहेत. मात्र हे नर्सिंग होम असल्यामुळे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणे अवघड आहे. या उपचारांसाठी येणारा खर्च आठ लाख रुपये असून तो पेलणे अक्षयकुमार घोलप व त्यांच्या कुटुंबीयांना अशक्‍य होत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कुठून मदत उपलब्ध होणार याची चिंता या माता-पित्याला आहे. अक्षयकुमार घोलप यांनी आपल्या चिमुकल्यांसाठी समाजातील दानशूर लोकांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A father's struggle ... to save his three hew born babies