सगळीकडे अराजकता, तरी त्यांचा विजय कसा? - फौजिया खान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नगर - 'देशात, राज्यात विरोधी वातावरण आहे. सरकारवर कोणाचा विश्‍वास नसल्याने वेगवेगळ्या कारणांनी लोक रस्त्यावर उतरत आहेत. सगळीकडे अराजकता असताना सरकारचे लोक निवडून येतातच कसे?,'' असा प्रश्‍न राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी उपस्थित केला. "सरकारचा प्रत्येक बाबीत हस्तक्षेप होत असल्याने लोकशाही धोक्‍यात आली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे लोक मोठ्या पदावर बसविले जातात,' असा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे "संविधान बचाव, देश बचाव' अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्त फौजिया खान आज येथे आल्या होत्या.

त्या म्हणाल्या, 'सरकारने निवडणूक आयोग, आरबीआय, मीडिया ताब्यात घेतला आहे. न्यायव्यवस्थेतील लोकही आता समोर येऊन व्यथा मांडत आहेत. वरिष्ठ अधिकारी पदावर "आरएसएस' विचारसरणीचे लोक भरण्याची योजना आखली आहे. अगदी राज्यपालही "आरएसएस'चे आहेत की नाही, हे पाहिले जाते. हे देशासाठी घातक असून, लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे. सरकार गुंडशाहीला पाठबळ देत आहे. लोकांची हत्या करणाऱ्यांचा सत्कार केला जात आहे.''

Web Title: faujiya khan talking