इकडे मनसे जाेमात तिकडे राष्ट्रवादी काेमात

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या माेर्चाबाबत आम्हांला अथवा आमच्या प्रमुख नेत्यांना काेणत्याही प्रकारची सूचना केली नव्हती असे सांगितले. यामुळे हा माेर्चा सातारकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

सातारा  : मुंबईमध्ये आज (रविवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आले हाेते. हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा निघालेला हा मोर्चा बांग्लादेशी व पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात हाेता. या माेर्चात लाखाेंच्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले हाेते. दूसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आजच सीएए विरोधात सातारा शहरात एल्गार पुकारला हाेता. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा माेर्चा काढण्यात येणार हाेता. परंतु हाताच्या बाेटावर माेजण्याइतकेच कार्यकर्ते जमल्याने अखेर निदर्शने करुन पदाधिकारी परतीच्या मार्गावर गेले. राष्ट्रवादीच्या न झालेल्या माेर्चाची राजकीय गाेटात मात्र चांगलीच चर्चा रंगली.

शुक्रवारी (ता. सात) झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पार्थ पोळके यांनी माेर्चाची माहिती दिली हाेती. केंद्र सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. देशात आर्थिक मंदी, प्रचंड बेकारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, कलम 370, बाबरी मशीद, सीएएसारख्या गरज नसलेल्या बाबींवरून देशात जातीय, धार्मिक तणाव वाढवला जात आहे असे पाेळके यांनी नमूद केले हाेते. 

हजारो वर्षे ज्यांचे वाडवडील या देशात राहतात, त्यांनाच हे मोदी सरकार तुम्ही भारताचे नागरिक आहात काय? याचे पुरावे मागत आहे. ज्यांचे पुरावे नसतील त्याला निर्वासित छावणीमध्ये ठेवण्यात येत असून, ही हिटलरशाहीच आहे. त्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रविवारी गांधी मैदानावरून भव्य मोर्चा काढणार असल्याचे नमूद केले हाेते. 

या माेर्चात पक्षाचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने व मी मोर्चाचे नेतृत्व करतील असे सांगितले हाेते. पाेळके यांच्या पत्रकार परिषदेस अरविंद गाडे, बाळू सावंत, राजाभाऊ माने, नवनाथ शिंदे, फारुख पटणी, आयशा पटणी, बबन गोखले, दादा आवटे, नंदू ढाले, मानसिंग शेलार, चंद्रकांत कांबळे, भिकाजी सपकाळ, आनंद कांबळे, विनय खांडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते. 

मुंबईतील मनसेचा माेर्चा भव्य दिव्य झाला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या छाेट्याखानी भाषणातून कार्यकर्त्यांना उत्तेजीत केले. दूसरीकडे मात्र सातारामधील आजच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माेर्चा चर्चेत राहिला. दुपारी 12 वाजता गांधी मैदानावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा पाेलिसांची संख्या जादा हाेती. एक वाजला माेजकेच कार्यकर्ते जमले. अखेर दाेन वाजता जमलेल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारींनी घाेषणा दिल्या. अवघ्या दहा ते पंधरा मिनीटांत कार्यकर्त्यांनी तेथेच निदर्शने केली आणि परतीचा मार्ग स्विकारला. 

दरम्यान राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या माेर्चाबाबत आम्हांला अथवा आमच्या प्रमुख नेत्यांना काेणत्याही प्रकारची सूचना केली नव्हती असे सांगितले. 

वाचा : साताऱ्याचा हवालदार नडला पुण्याच्या पोलिस अधीक्षकांना

हेही वाचा : काळजाला भिडतेय स्मशानातील माया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Few Response For Nationalist Congress Party Morcha In Satara