मर्दासारखे लढा; रडीचा डाव कशाला हवाय : शशिकांत शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

साताऱ्यातील सर्वसामान्य माणूस इतिहास घडवितो, हे येत्या 22 तारखेला दिसेल.

सातारा : निवडणूक मर्दासारखी लढण्याऐवजी भाजपकडून रडीचा डाव खेळला जात आहे. कपट, कारस्थानातून सत्ता मिळवायची हेच भाजपचे राजकारण आहे. पण, शिवस्वराज्य यात्रेत साताऱ्यातील जनतेने राष्ट्रवादी आणि शरद पवारांवरील विश्‍वास दाखवून दिला आहे. तोच विश्‍वास 22 तारखेला दाखवून देत सोलापुरात ज्या पद्धतीने पवारांचे जल्लोषात स्वागत झाले, त्याचीच पुनरावृत्ती साताऱ्यात राष्ट्रवादीचे तरुण करतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद, आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या रविवारी (ता.22) होणाऱ्या दौऱ्याच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी भवनात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुधीर धुमाळ, सारंग पाटील, भारती शेवाळे, शिवाजी सर्वगौड, मानसिंगराव जगदाळे, समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत पिसाळ, किरण साबळे, सतीश चव्हाण, सुरेंद्र गुदगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाईचे आमदार मकरंद पाटील बैठकीस उपस्थित नव्हते. 

राष्ट्रवादीवर आरोप करून भाजपमध्ये जाऊन पवित्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, स्वत:चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जिवावर निवडणूक लढू शकत नाहीत म्हणून तर इतर पक्षातील नेत्यांना घेऊन विधानसभा लढण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. महाजनादेश यात्रेवेळी करंटची भीती वाटत असल्याने वीज बंद करण्यात आली होती. त्यांना या निवडणुकीत लोकांचा करंट सहन होणार नाही. ज्यांच्या मागे "ईडी'ची चौकशी लावली, ती मंडळी येडी झाली आहेत. काहीजण दबाव टाकल्याने गेले. आता मलाही अटक होणार, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. पण, मी शशिकांत शिंदे आहे. अटकेच्या भीतीला मी घाबरत नाही. भाजपने मर्दासारखी निवडणूक लढावी, रडीचा डाव खेळू नये.

शरद पवार यांना संपविणारा अजून जन्मायचा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. 25 वर्षे पवारांसोबत राहिलेली मंडळी सोडून गेली. त्यांनी ही साथ सोडताना विचार करायला हवा होता. त्यामुळे आता कर्तव्य करायची जबाबदारी तुमच्या-आमच्यावर आली आहे. सत्तेवर येताना बेरीज-वजाबाकीचे राजकारण करताना निर्णय फिरविण्याची ताकद केवळ राष्ट्रवादीतच आहे. त्यामुळे परिणामाचा विचार करू नका. सोलापुरात पवारांच्या दौऱ्यात तरुणाईने जी ताकद दाखवली, त्यापेक्षाही जास्त ताकद साताऱ्यातील राष्ट्रवादीचे तरुण दाखवून इतिहास करतील. साताऱ्यातील सर्वसामान्य माणूस इतिहास घडवितो, हे येत्या 22 तारखेला दिसेल. लाव्हारसाप्रमाणे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उद्रेक करून दाखवेल. 

बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यातील युवकांत प्रचंड ऊर्जा आहे. आता त्यांनी पुढे आले पाहिजे. हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा असून पवारांच्या पुरोगामी विचारांना आपण यानिमित्ताने पुढे न्यायचे आहे. सारंग पाटील म्हणाले, ही वादळापूर्वीची शांतता असून इतक्‍या घडामोडी घडूनही शरद पवार शांत आहेत. जिल्ह्याला वैचारिक परंपरा असून पवार यांच्या विचारांवर निष्ठा ठेऊन आपण सर्व चालत आहोत. आता ही निष्ठा दाखविण्याची संधी आपल्याला आली आहे. 1999 मध्ये नवीन पक्ष असूनही नऊ आमदार आणि दोन खासदार जनतेने राष्ट्रवादीला दिले. जिल्ह्याने राज्याला नेतृत्व दिले आहे. त्यामुळे यावेळेसही जिल्ह्यातील जनता श्री. पवार यांच्याच विचारांना साथ देईल. 

भारती शेवाळे म्हणाल्या, पक्षाने कितीही दिले तरी पोट भरत नाही, अशी मंडळी पक्ष सोडून गेली आहेत. पण, श्री. पवार यांचा मावळा त्यांच्यासोबतच आहे. महिलांना सक्षम करण्याची भूमिका त्यांनी घेतली. नवरात्रीत जगदंबा दुर्गेचा अवतार घेते, त्यानुसार या निवडणुकीत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी दुर्गेचा अवतार घेऊन राजकारणातील वाईट प्रवत्तींचा नायनाट करावा. 

सुनील माने म्हणाले, गेले ते कावळे आणि उरले ते श्री. पवार यांचे मावळे आहेत. मावळ्यांनी आपण सर्वजण श्री. पवार यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे दाखवून देऊ. यावेळी कविता म्हेत्रे यांचे भाषण झाले. राजेंद्र लावंघरे यांनी सूत्रसंचालन केले. 

रामराजेंची दांडी... 

शरद पवार यांच्या रविवारच्या दौऱ्याच्या नियोजनार्थ राष्ट्रवादी भवनात झालेल्या आजच्या बैठकीस फलटणचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण उपस्थित नव्हते. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याने या तिघांच्या गैरहजेरीची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मात्र दबक्‍या आवाजात चर्चा होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight like a man says Shashikant Shinde